औरंगाबाद : पैसे न देता ब्‍लँकेट नेताना विरोध; दुकानदारावरच दरोडेखोरांचा गोळीबार | पुढारी

औरंगाबाद : पैसे न देता ब्‍लँकेट नेताना विरोध; दुकानदारावरच दरोडेखोरांचा गोळीबार

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : स्वेटरच्या दुकानातून बळजबरीने ब्लॅंकेट उचलून पैसे न देताच जीपमध्ये बसून एकजण जावू लागला. यावेळी विरोध करताच जीपमधील पाच ते सहा जणांनी लाकडी दांडे, स्टीलच्या पाईप हातात घेऊन दुकानदारास मारहाण सुरु केली. यावेळी मदतीसाठी आलेल्या इतर दुकानदारांनी मारहाण करणाऱ्याच्या दिशेने दगडफेकीस सुरुवात केली. त्‍यामुळे एका व्यक्‍तीने बंदुकीने गोळीबार केला. ही घटना (मंगळवार) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नगर महामार्गावर घडली.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथील मुकेश नाथूलाल बंजारा, त्यांचा भाऊ नेना बंजारा, रोडुलाल बंजारा, दाजी राजू बंजारा यांच्यासह जवळपास ३० जणांनी गेल्या तीन महिन्यांपासून स्‍वेटर तसेच उबदार कपड्यांच्या विक्रीचे दुकान लावले आहे. नगर महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपाजवळ दहा बाय दहा जागेत बांबू व ताडपत्री पासून बनविलेल्या दुकानात स्वेटर, ब्लॅकेट्स आदी उबदार कपडे विक्री करून ते त्याच ठिकाणी राहतात. नेहमीप्रमाणे (मंगळवार) रात्री नऊ-साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समोरच्या बाजूने फट्टा टाकून दुकाने बंद करून स्वेटर विक्रेत्यांनी जेवण केले. त्यानंतर ते झोपण्याच्या तयारीत होते.

यावेळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुकेश बंजारा यांच्या दुकानासमोर एक पांढऱ्या रंगाची जीप (एमएच २०, एजी-६००१) येऊन उभी राहिली. जीपमधून खाली उतरलेल्या पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्‍या व दाढी असलेला तसेच आणखी एका इसमाने दुकाना समोरील फट्टा बाजूला केला आणि न विचारताच दुकानातील ब्लॅकेटस उचलून ते जीपमध्ये टाकत असताना दुकानदार मुकेश याने पाहिले. त्यांना भैया क्या कर रहे हो कंबल कहा लेके जा रहे हो, पैसे तो दो असे म्हटले. यावर एकाने मेरोको पहचानते हो क्या, पैसे नही देता, जो करणा हे कर असे म्‍हणत गाडीत बसण्यास गेला.

ते पाहून दुकानदार मुकेशने त्याच्या हातातील ब्लॅकेंट्स ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे जीपमध्ये बसलेल्या चार जणांनी हातात स्‍टीलच्या पाईप, लाकडी दांडा घेऊन मुकेश यांच्यावर हल्‍ला केला. ते पाहून मुकेश याने दुकानाच्या बाहेर पळ काढला. त्‍याने मदतीसाठी आरडाओरड केली. यावेळी मुकेश याचे दाजी राजू बंजारा, चैनसिंग बंजारा व इतर दुकानदारांनी मदतीसाठी धाव घेतली.

ते पाहून ब्‍लॅँकेट नेणाऱ्यातील एकाने राजू बंजारा याला लोखंडी रॉडने मारहाण केली. दरम्यान जमा झालेल्या दुकानदारांनी मारहाण करणाऱ्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली. ते पाहून लुटारूतील एका व्यक्‍तीने दुकानदारांच्या दिशेने गोळीबार केला. दुकानदार आणि नागरिकांची संख्या अधिक असल्‍याने लुटारूंनी त्यांची स्कॉर्पिओ जीप घटनास्थळी सोडून तेथून नगर रोडच्या दिशेने पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूजचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी स्कॉर्पिओ जीपची तपासणी केली असता, जीपमध्ये मिरची पूड, लाकडी दांडे, स्टीलचा रॉड आदी दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले. या प्रकरणी मुकेश बंजारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेतील पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :  

Back to top button