धामणी खोऱ्याला वरदान ठरली बॅकवॉटर योजना | पुढारी

धामणी खोऱ्याला वरदान ठरली बॅकवॉटर योजना

पुढारी वृत्तसेवा; दिगंबर सुतार : उन्हाळा जसजसा वाढत जातो तसे पाण्याचे महत्व जाणवू लागते. मग पाण्याचे योग्य नियोजन असो, काटकसर असो अशा गोष्टी लोकांकडून कटाक्षाने पाळल्या जातात. धामणी खोऱ्यात मात्र कितीही पाण्याची काटकसर केली तरी उन्हाळ्यात दोन महिने लोकांना तहाणेने व्याकूळ व्हावेच लागते. कधी कधी पाण्याअभावी आपत्कालिन परिस्थितीही उद्भवते. निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्याची कसब मात्र येथील लोकांनाच जमते. बॅकवॉटर पद्धतीने नदी प्रवाहीत करूण धामणी खोऱ्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी दहा वर्षांपासून पाणीटंचाईवर काहीशी मात केली आहे.

पाणी टंचाईची दाहकता मोठी आहे. लोकांची कैफियतही मोठी आहे. तरीही शासनाची भूमिका ढिम्मपणाची असल्याने हतबल नाही व्हायचे तर नेटाने जगायचे हाच मुलमंत्र जोपासलेल्या येथील लोकांचा प्रवास पावसाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू होईपर्यंत फक्त पाण्याच्या नियोजनातच व्यतित होत असतो. टंचाईच्या उद्रेकाला थोपवण्यासाठी अगदी लाखो खर्चाचे मातीबंधारे बांधण्यापासून कोरड्या नदीपात्रात मोठमोठे खड्डे खोदण्या पर्यंत लोकांना मजल मारावी लागते. एवढ्यावरच न थांबता उलट्या प्रवाहाने नदी प्रवाहीत करण्याचे धाडसही लोकांनी केले आहे. हीच ती बॅकवॉटर योजना जिच्यामुळे धामणी खोऱ्यातील अर्धा भाग हिरवाईने सध्या डोलत आहे.

पाटबंधारे प्रकल्पाअभावी धामणी खोऱ्यात पाणीटंचाई निर्माण होते. बारमाही वाहणाऱ्या कुंभी नदीला धामणी नदी जिथे मिळते तेथून काही मोजक्याच अंतरावर कुंभीच्या पाण्याचा फुगवटा धामणीत येत असतो. हेच पाणी वर धामणीत लिप्ट केले तर पाणीटंचाईवर काहीशी फुंकर पडेल ही लोकांची माणसिकता बळावली. मुळातच खर्चीक बंधारे बांधून मेटाकुटीस आलेल्या येथील शेतकऱ्याला पाणी लिप्ट करण्याचा खर्च तसा न झेपणारा होता. मात्र लोकांच्या या अपेक्षेला लोकप्रतिनिधींकडून दुजोरा मिळाला. धामणी प्रकल्पाच्या उभारणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते तत्कालिन पन्हाळा – बावड्याचे आमदार विनय कोरे यांच्या दातृत्वातून बॅकवॉटरचा प्रयोग दहा वर्षापूर्वी अस्तित्वात आला आजघडीस तो यशस्वीही झाला.

उच्च अश्वशक्तीच्या पंपाद्वारे कुंभीचे पाणी धामणीच्या कोरड्या पात्रात पडू लागले. सुरुवातीला आंबर्डे येथील बंधारा भरला तो भरता भरता वरील पणोरे येथीलही बंधारा भरू लागता. अगदी आंबर्डे, वेतवडे, हरपवडे, पणोरे आदी सात आठ गावांतील शेतशिवारांत पाणी फिरु लागले. पिके तरारली अगदी जोमाने वाढली. शेतकऱ्याच्या जीवनात काहीशी सुबत्ता येत गेली आणि या योजनेला पुन्हा शेतकऱ्यांकडूनच ताकद मिळत गेली. उच्च अश्वशक्तीचे विद्युतपंप आणणे, बसवणे त्यासाठी अतिरिक्त विजेची सोय, विजेचा खर्च या सर्व गोष्टी खर्चिक आहेत. मात्र उलट्या प्रवाहाने नदी प्रवाहित करण्याचे धाडस गत दहा बारा वर्षांपासून येथील शेतकरी करत आहे. कारण खर्चाला न जुमानता शेतकऱ्यांची शेती जगवण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते.

अशी योजना येथील सर्वच बंधाऱ्यांवर राबवणे भौगोलिक दृष्ट्या अशक्य आहे. परिणामी गवशी पासून वरील वीसभर गावांची होरपळ कायम आहे. बॅकवॉटरचा प्रयोग येथील काही गावांना लाभदायी ठरत असला तरी तो अवास्तव खर्चिक आहे. त्यामुळे एकूणच परिस्थितीवर धामणी प्रकल्पातून पाणी सुटणे ही एकमेव मात्रा आहे.

हेही वाचा : 

Back to top button