कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मधमाश्यांचा हल्ला; ३० जखमी, एक बेशुद्ध | पुढारी

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मधमाश्यांचा हल्ला; ३० जखमी, एक बेशुद्ध

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात 30 हून अधिक जण जखमी झाले. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता रेल्वे फाटक ते महालक्ष्मी चेंबर्स या दरम्यान ही घटना घडली. मधमाश्यांच्या हल्ल्यात एक मोटारसायकलस्वार काही काळ बेशुद्ध पडला होता. मधमाश्यांमुळे वर्दळीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रचंड धावपळ उडाली.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या परिसरातील एका ज्वेलर्सच्या इमारतीवरील मधाच्या पोळ्याचा काही भाग तुटून खाली पडला. यानंतर हजारो माश्या घोंगावत रस्त्यावर आल्या. यामुळे मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नरकडून रेल्वे फाटकाकडे जाणार्‍या तसेच रेल्वे फाटकाकडून मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर आदीकडे जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. दिसेल त्याला मधमाश्या चावा घेऊ लागल्याने पळापळ सुरू झाली.

या परिसरातील एका फळ विक्रेत्याचा मोठ्या प्रमाणात मधमाश्चांनी चावा घेतला. यावेळी दुचाकीवरून जाणारा एकजण मधमाश्यांच्या तावडीत सापडला. मधमाश्यांच्या चाव्याने तो बेशुद्ध होऊन पडला. नागरिकांनी कसेबसे त्याला बाजूला घेतले. त्याची मोटरसायकलही बाजूला घेतली. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर तो निघून गेला. एका युवतीवरही मधमाश्यांनी हल्ला चढवला. स्कार्फच्या मदतीने मधमाश्या हुसकवण्याच्या प्रयत्नात अनेक मधमाश्या त्या स्कार्फमध्येच अडकल्याने अखेर तो स्कार्फच जाळावा लागला. या परिसरातील दुकानदारांनी जे मिळेल ते साहित्य आपल्याभोवती गुंडाळून घेतले.

रिक्षातून ये-जा करणार्‍या प्रवाशांसह चालकालाही मधमाश्यांनी सोडले नाही. दुचाकीस्वारांवरही त्यांनी हल्ला चढवला. मधमाश्यांचा हा थवा दाभोळकर कॉर्नरपर्यंत होता. या परिसरात पळापळ सुरू झाली. पळत जाणार्‍यांच्या मागे मधमाश्या होत्याच, त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांची पळापळ झाली. दरम्यान, ही माहिती मिळताच अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाने मधमाश्या परतल्यानंतर वातावरण पूर्ववत झाले. दरम्यान, मधमाश्यांच्या हल्ल्यात 30 हून अधिक जण जखमी झाल्याचे परिसरातील दुकानदारांकडून सांगण्यात आले.

Back to top button