Lok Sabha Election 2024 | कोल्हापूर : लाल झेंडा, काँग्रेसचा तिरंगा ते भगवा | पुढारी

Lok Sabha Election 2024 | कोल्हापूर : लाल झेंडा, काँग्रेसचा तिरंगा ते भगवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा राजकीय इतिहास मोठा उलथापालथीचा आहे. पुरोगामी जिल्हा म्हणून डावा विचार येथे रुजला. मात्र, बदलत्या काळात त्यांची ताकद कमी झाली. ती कसर काँग्रेसने भरून काढली. नंतरच्या काळात जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत होताच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची जागा घेतली. तरुण मतदारांना मात्र शिवसेनेने भुरळ घातली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ लाल झेंडा, काँग्रेसचा तिरंगा ते भगव्या रंगात न्हाऊन निघाला.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे नाव कोल्हापूर कम सातारा असे होते आणि या मतदार संघातून दोन खासदार लोकसभेवर निवडून देता येत होते. या पहिल्या निवडणुकीत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे अपक्ष, तर रत्नाप्पाण्णा कुंभार हे काँग्रेसचे उमेदवार पहिल्यांदा निवडून आले. त्यांना अनुक्रमे 2 लाख 23 हजार 56 व 1 लाख 63 हजार 505 मते मिळाली होती.

डिगे, महागावकर विजयी

1957 साली कोल्हापूर असे या मतदार संघाचे नाव निश्चित करण्यात आले. याही मतदार संघातून एकावेळी दोन खासदार निवडून देता येत असत. या निवडणुकीत एस. के. डिगे हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर तर भाऊसाहेब महागावकर हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यांना अनुक्रमे 2 लाख 69 हजार 605 व 2 लाख 30 हजार 945 मते मिळाली होती.

काँग्रेसचा विजय

पुढे 1962 साली कोल्हापूर हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदार संघातून पहिल्यांदाच काँग्रेसचे व्ही. टी. पाटील निवडून आले. त्यांना 1 लाख 44 हजार 856 मते मिळाली होती. 1967 साली शंकरराव माने हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यांना 1 लाख 58 हजार 327 मते मिळाली होती.

जनता लाटेत शेकापचा विजय

1971 च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा पराभव करून राजाराम दादासाहेब निंबाळकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यांना 2 लाख 3 हजार 631 मते मिळाली होती. पुढे आणीबाणीनंतर आलेल्या काँग्रेस विरोधी जनता लाटेत कोल्हापूरची जागा शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेसकडून खेचून घेतली. शेतकरी कामगार पक्षाचे दाजीबा देसाई हे 1 लाख 86 हजार 77 मतांनी निवडून आले.

गायकवाड यांचा विजयाचा विक्रम

काँग्रेस फुटीनंतर इंदिरा गांधी यांनी काँग्रेसची बांधणी करून नवे चेहरे राजकारणाच्या आखाड्यात उतरविले. उदयसिंगराव गायकवाड हे काँग्रेस आयचे उमेदवार 2 लाख 45 हजार 757 मते मिळवून विजयी झाले. पुढे सलग पाच टर्म त्यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला. 1984 च्या निवडणुकीत गायकवाड हे 2 लाख 77 हजार 603 मते मिळवून विजयी झाले.

तगडे आव्हान उभारले; पण…

1989 च्या निवडणुकीत त्यांना पक्षांतर्गत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाचे गोविंदराव कलिकते यांच्या उमेदवारीमागे काँग्रेस नेत्यांची छुपी ताकद होती. मात्र, त्यावर मात करीत गायकवाड हे 2 लाख 74 हजार 676 मते मिळवून विजयी झाले. 1991 साली गायकवाड हे 2 लाख 69 हजार 508 मते मिळवून विजयी झाले. 1996 च्या निवडणुकीत 2 लाख 36 हजार 739 मते मिळवून विजयी झाले.

कागलची कुस्ती कोल्हापूरच्या आखाड्यात

विक्रमसिंह घाटगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यासमोर गायकवाड यांचा निभाव लागणार नाही, अशी भूमिका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतली. त्यामुळे गायकवाड यांचा पत्ता कट झाला. सदाशिवराव मंडलिक आणि घाटगे दोघेही कागलचे. कागलच्या आखाड्यातील कुस्ती कोल्हापूरच्या आखाड्यात झाली आणि 3 लाख 67 हजार 951 मते मिळवून मंडलिक खासदार झाले. 1999 साली काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली. मंडलिक हे राष्ट्रवादीकडून लढले व 3 लाख 46 हजार 459 मते घेऊन विजयी झाले.

मंडलिकांचा निसटता विजय

2004 च्या निवडणुकीत मंडलिक यांच्यासमोर धनंजय महाडिक या तरुण उमेदवाराने आव्हान उभारले. मात्र, मंडलिक 14 हजार 753 अशा निसटत्या मताधिक्यांनी विजयी झाले.

राष्ट्रवादीत मंडलिकांचे बंड यशस्वी

पुढे 2009 च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि मंडलिक यांच्यात वाद झाला. मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह खासदारपदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मंडलिक विजयी झाले व अपक्ष म्हणून निवडणूक लढवित त्यांनी आपली जागा कायम राखली. त्यांना 4 लाख 28 हजार 82 मते मिळाली होती.

धनंजय महाडिक यांचा विजय

2004 च्या निवडणुकीत विजयाने थोडक्यात हुलकावणी दिलेल्या धनंजय महाडिक यांनी 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाजी मारली. त्यांना 6 लाख 7 हजार 665 मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव केला.

शिवसेनेचा भगवा लोकसभेवर

2019 च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या तिकिटावर या पराभवाचा वचपा काढत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना पराभूत केले. मंडलिक यांना 7 लाख 49 हजार 85 मते मिळाली.

Back to top button