House Prices Rose : मुंबई वगळता देशातील महानगरांत घरांच्या किमती भडकल्या! | पुढारी

House Prices Rose : मुंबई वगळता देशातील महानगरांत घरांच्या किमती भडकल्या!

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोरोना काळात अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकून टाकून देशात अर्थव्यवस्थेची सुरू झालेली घोडदौड बांधकाम क्षेत्रामधील किंमत वाढीने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2023) देशातील बांधकाम क्षेत्रातील किमतींमध्ये मुंबई आणि चेन्नईचा अपवाद वगळता उर्वरित सहा महानगरांमध्ये दुहेरी अंकात वाढ झाली आहे, तर दिल्लीमध्ये 2021-22 च्या तुलनेत तब्बल 59 टक्के वाढ नोंदविली आहे. (House Prices Rose)

बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची शिखर संघटना असलेली ‘क्रिडाई’ या क्षेत्रातील सल्लागार कंपनी म्हणून ओळखली जाणारी ‘कॉलियर्स’ आणि माहितीचे संकलन करून त्याचे विश्लेषण करणारी ‘लायझेस फोरास’ या तीन संस्थांच्या वतीने बुधवारी संयुक्तरीत्या घरबांधणी प्रकल्पातील किमतींविषयीचा ‘हाऊसिंग ट्रॅकर रिपोर्ट क्यू-1-2023’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यानुसार दिल्लीमध्ये किमतीत सर्वाधिक 16 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली, तर मुंबईमध्ये या किमतीत दोन टक्क्यांची घसरण झाल्याचे अनुमान आहे. (House Prices Rose)

सार्वजनिक क्षेत्रातील एखादा मोठा प्रकल्प संबंधित परिसराचा कसा चेहरामोहरा बदलू शकतो, याचे उदाहरण द्वारका एक्स्प्रेस-वे ने घालू दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ आणि त्याला जोडणार्‍या आजूबाजूच्या रस्त्यांचे प्रशस्त रुंदीकरण झाल्यामुळे तेथील घरांच्या किमतींमध्ये तब्बल 59 टक्केे वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीतील गोल्फ कोर्स रोड हा सध्या गृहप्रकल्पांच्या किमतींसाठी सर्वात महाग परिसर ठरला आहे, तर अहमदाबाद येथील घरांच्या किमती 11 टक्क्यांनी वाढून सरासरी 6 हजार 324 रुपये चौरस फुटावर पोहोचल्या आहेत. दिल्लीपाठोपाठ कोलकाता व बंगळूरमध्ये घरांच्या किमती अनुक्रमे 15 व 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हैदराबादमध्ये 13 टक्के किंमत वाढ झाली आहे, तर पुणे व अहमदाबादमध्ये घरांच्या किमतीत प्रत्येकी 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशातील महानगरांत गृहबांधणी प्रकल्पांच्या वाढत्या किमतीला संबंधित परिसरात जागांचे वाढणारे भाव आणि बांधकाम खर्चामध्ये झालेली वाढही जबाबदार आहे. या अहवालात दिल्लीमध्ये गेल्या 11 तिमाहीत किमती वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविताना गोल्फ कोर्स रोड आणि गुरगाव येथील किमतीमध्ये गतवर्षाच्या तुलनेत अनुक्रमे 56 व 42 टक्क्यांची वाढ असल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा :

Back to top button