Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यात चोरी | पुढारी

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यात चोरी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) मुंबईतील जुहू येथील घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला ही घटना आठवडाभरापूर्वी घडल्याची माहिती दिली आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, जुहू पोलिस ठाण्यात तक्रार आली होती, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या घरात चोरी झाल्याचे आणि काही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे सांगण्यात आले होते. तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी तपास पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या हाऊसकीपिंग मॅनेजरने पोलिसांना चोरीची माहिती दिली होती. (Shilpa Shetty)

हाऊसकीपिंग मॅनेजरने तक्रारीत म्हटले आहे की, “मे महिन्याच्या अखेरीस बंगल्यात काही नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. त्याचवेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबीयांसह परदेशात सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. ६ जून रोजी जेव्हा आम्ही बंगल्यात गेलो होतो. तेव्हा बंगल्यातील हॉल, डायनिंग रूम आणि मास्टर बेडरूममधील सामान अस्थाव्यस्थ पडल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर शिल्पा शेट्टी यांच्या मुलीच्या बेडरूममधील वॉर्डरोबही उघडे होते. त्यानंतर आम्ही तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासणी केली. तेव्हा बंगल्याच्या आवारात मास्क घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीला स्लाइडिंग खिडकी उघडून बेडरूममध्ये प्रवेश करून वस्तू चोरत असल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.” (Shilpa Shetty)

व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून, पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर अभिनेत्रीच्या बंगल्याच्या आसपासच्या भागात बसवण्यात आलेल्या ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आहेत. तपासानंतर शहरातील विलेपार्ले परिसरातून दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button