World Air Quality Report : प्रदूषणाने घुसमटली राज्यातील शहरे; मुंबई, कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषण | पुढारी

World Air Quality Report : प्रदूषणाने घुसमटली राज्यातील शहरे; मुंबई, कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषण

छत्रपती संभाजीनगर; धनंजय लांबे : जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 9, तर देशातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई आणि कल्याण या दोन महानगरांचा समावेश झाला आहे. औद्योगिक आणि वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणाचाच यात मोठा वाटा असून, राज्यातील जवळपास सर्वच शहरांमधील हवा आरोग्यासाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. (World Air Quality Report)

सन 2022 मध्ये एक्यूआर या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरातील शहरांच्या हवेच्या (एअर क्वालिटी रिपोर्ट) गुणवत्तेचे सर्वेक्षण केले. त्यात पहिल्या 20 सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये चौथ्या स्थानावर दिल्ली, त्याखालोखाल मुजफ्फरनगर (5), गाझियाबाद (7), पाटणा (8), हापूड (9), लखनौ (11), चंदीगड (14), जयपूर (15) आणि कोलकाता (19) असा क्रम आहे. सुदैवाने जागतिक पातळीवरील दूषित शहरांमध्ये महाराष्ट्राचे नाव नसले, तरी देशपातळीवर मुंबई आणि कल्याण या दोन महानगरांमधील हवा दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे. औद्योगिक शहरांमध्ये औद्योगिक प्रदूषणाचे प्रमाण मोठे असले तरी ही शहरे रोजगारक्षम असल्यामुळे या प्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना करता येत नाहीत. वाहनांमुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाला मात्र आळा घालता येतो. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात औद्योगिक प्रदूषण जेथे पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील हवादेखील केवळ वाहनांच्या धुरामुळे प्रदूषित झाली आहे. (World Air Quality Report)

कारपेक्षा दुचाकी घातक ! (World Air Quality Report)

एक दुचाकी नेमके किती प्रदूषण करते, याची सरकारी आकडेवारी उपलब्ध नसली तरी बॉम्बे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार एक दुचाकी प्रत्येक किलोमीटरमागे 1.2 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड (सीओ), 0.2 ग्रॅ. नायट्रोजन ऑक्साईड (एनओएक्स) आणि 0.1 ग्रॅ. धुलिकण (पीएम) हवेत सोडते. एक कार प्रतिकिलोमीटर 0.8 ग्रॅ. सीओ, 0.1 ग्रॅ. एनओएक्स आणि 0.05 ग्रॅ. पीएम सोडते. म्हणजेच कारपेक्षा दुचाकीतून जास्त प्रदूषण होते, असा या अभ्यासाचा निष्कर्ष होता. शिवाय, ज्या दुचाक्या 10 वर्षे किंवा त्याहून जास्त जुन्या असतात, त्या अडीच पट जास्त कार्बन, चार पट जास्त, नायट्रोजन ऑक्साईड आणि तब्बल 5 पट जास्त धुलिकण बाहेर टाकतात, असेही या अभ्यासातून स्पष्ट झाले.

एक्यूआय अहवालातून प्रदूषणाचे नेमके स्रोत स्पष्ट झाले आहेत. वाहने, ऊर्जा निर्मिती, औद्योगिक कचरा, स्वयंपाकाचा धूर, बांधकाम क्षेत्र आणि पिकांची चिपाडे जाळल्यामुळे शहरांमध्ये 20 ते 35 टक्के प्रदूषण होते.

14 जून 2023 रोजी नोंदविण्यात आलेले प्रमुख शहरांमधील प्रदूषण

शहर……….एअर क्वालिटी इंडेक्स

छ. संभाजीनगर………..150
नागपूर………………..150
पुणे…………………..100
मुंबई…………………80
ठाणे………………….90
नाशिक……………….110
सोलापूर………………120
कोल्हापूर……………..130
(130 पेक्षा जास्त : वाईट; 130 पेक्षा कमी : सहन करण्याजोगे. )

धुलिकणांचे प्रमाण

शहर…………….टक्के
मुंबइ……………50%
छ. संभाजीनगर…..30%
पुणे…………….20%
नाशिक………….40%
कोल्हापूर………..50%
सोलापूर…………60%
ठाणे…………….70%
नागपूर…………..80%

जिल्हानिहाय नोंदणीकृत वाहने (2022)

मुंबई………. 1,42,54,118
ठाणे………..63,00,000
पुणे…………47,55,948
नागपूर………27,59,271
नाशिक……..24,40,100
संभाजीनगर….20,69,974
सोलापूर…….14,58,563
अमरावती…..12,40,417
जळगाव…….11,21,495
पुणे ग्रामीण….10,79,576

एक्यूआयप्रमाणे प्रदूषित शहरे

शहर………………एक्यूआय
मुंबइ………………146
भिवंडी…………….143
कल्याण…………..142
पुणे……………….137
यवतमाळ………….136
छ. संभाजीनगर…….135

अधिक वाचा :

Back to top button