कोल्हापूर : तुरबत मोडतोड प्रकरणाच्या निषेधार्थ पन्हाळा बंद; सर्वत्र शुकशुकाट | पुढारी

कोल्हापूर : तुरबत मोडतोड प्रकरणाच्या निषेधार्थ पन्हाळा बंद; सर्वत्र शुकशुकाट

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा येथील तानपीर दर्ग्याची व तुरबतींची मोडतोड केल्याप्रकरणी पोलिसांनी दोषींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी तसेच या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज पन्हाळा नागरिकांनी उस्फुर्तपणे पन्हाळा बंद पुकारला आहे. या बंदमुळे पन्हाळ्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. नेहमी पर्यटकांनी गजबजलेली अशी तीन दरवाजा, अंधारबाव, तबक उद्यान आंबरखाना ही ऐतिहासिक ठिकाणे आज शांत दिसत होती. तर पन्हाळा शहरातील स्टँड चौक व ताराराणी मार्केट परिसरात देखील पूर्ण शुकशुकाट होता. येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवून घडलेल्या प्रकारचा निषेध नोंदवला आहे.

मोडतोडप्रकरणी संबंधितांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पन्हाळ्यात कोणीही यापुढे जातीय तणाव पसरवण्याचे प्रयत्न करू नये. पन्हाळा नागरिक आशा गोष्टींना अजिबात थारा देणार नाहीत, असा सूर नागरिकांतून जाहीरपणे व्यक्त केला जात आहे. किल्ल्यावर फार श्रद्धा व प्रेम असल्याचे सोशल मीडियावर भासवून हुल्लडबाजी करण्याच्या उद्देशाने जातीय तणाव निर्माण करण्याचे काही समाज कंटकांचे प्रयत्न पन्हाळकर नागरिक हाणून पाडतील. त्यामुळे पन्हाळ्यात पुन्हा असे प्रकार घडू नयेत व पन्हाळ्याची सामाजिक शांतता भंग करू नये, यासाठी मोडतोड प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. पोलिस प्रशासनाने तात्काळ सर्वांना अटक करावी, या मागणीसाठी नागरिकांनी उस्फुर्तपणे पन्हाळा बंद करण्यात आला आहे. पन्हाळा पोलिसांना एक आठवडा भर निवेदने देण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाला देखील कळवले होते. तरीही पन्हाळा पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे तुरबतींची मोडतोड झाली. याबाबत जिल्हा प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का? अशीही चर्चा पन्हाळा नागरिकांमध्ये होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button