चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या कोल्हापूर, शिरदवाड येथील घरांवर छापे | पुढारी

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या कोल्हापूर, शिरदवाड येथील घरांवर छापे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाचखोर अधीक्षक संजय पाटील (वय 54, मूळ रा. फिरंगाई तालीम, काळकाई गल्ली, शिवाजी पेठ) यांच्या येथील शिवाजी पेठ, आर.के.नगर व शिरदवाड (ता. शिरोळ) येथील घरांवर टाकलेल्या छाप्यांत 28 तोळे सोन्याचे दागिने, आलिशान मोटार आणि 80 लाखांचा बंगला व इतर अशी सुमारे दीड कोटीची मालमत्ता उघड झाली.

बीअर शॉपीच्या परवान्यासाठी व्यावसायिकाकडून कनिष्ठ अधिकार्‍यामार्फत एक लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांत अधीक्षक संजय पाटीलसह चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांचा समावेश आहे. यापैकी खारोडे व खताळ यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले आहे. सापळा कारवाईत दोन अधिकार्‍यांना अटक झाली आहे. अधीक्षक पाटील पसार झाले आहेत.

कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक

पथकाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक बापू साळोखे, आसमा मुल्ला यांच्या पथकाने अधीक्षक पाटील यांच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ व आर.के.नगर तसेच शिरदवाड (ता. शिरोळ) येथील घरांवर छापेमारी करून झडती घेतली.

आर.के.नगर येथील अधीक्षक पाटील यांच्या बंगल्याच्या झडतीत 28 तोळे सोन्याचे दागिने, 12 लाखांची आलिशान मोटार, 2 मोटारसायकली, 25 हजार 800 रुपयांची रोकड तसेच 80 लाख रुपये किमतीचा बंगला, अशी दीड कोटीची मालमत्ता आढळून आली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नाळे यांनी दिली.

कोल्हापूर, शिरदवाड येथे काही काळ संशयिताचे वास्तव्य!

चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधीक्षक संजय पाटील यांचे कोल्हापूरसह शिरदवाड येथे काही काळ वास्तव्य होते, अशीही माहिती मोबाईल लोकेशनद्वारे निष्पन्न झाली आहे. शोध पथकाचा सुगावा लागताच संशयित पाटील शिरदवाड येथून पसार झाल्याचेही नाळे यांनी सांगितले.

बीअर शॉपीच्या परवान्यासाठी टाळाटाळ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, घुग्घूस (जि. चंद्रपूर) येथील गोदावरी बार अँड रेस्टॉरंटचे मालक असलेल्या तक्रारदारांनी नवीन बीअर बार शॉपीचा परवाना मिळण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता. मात्र, अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी टाळाटाळ सुरू केली होती.

कार्यालयीन अधीक्षक खताळ रंगेहाथ सापडला!

तक्रारदार व्यावसायिकाने खारोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधीक्षक संजय पाटील व स्वत:साठी एक लाखाच्या लाचेची मागणी केली. व्यावसायिकाने पथकाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्याशी संपर्क साधून फिर्याद दाखल केली. पथकाने दि. 25 एप्रिल, दि. 3 मे रोजी पडताळणी केली. त्यानंतर संशयिताच्या वतीने एक लाखाची लाच घेताना पथकाने कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना रंगेहाथ पकडले.

Back to top button