पिंपरी : फुकट्या भाईंचा व्यापार्‍यांना त्रास; वेगवेगळ्या दुकानांची तोडफोड | पुढारी

पिंपरी : फुकट्या भाईंचा व्यापार्‍यांना त्रास; वेगवेगळ्या दुकानांची तोडफोड

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : झोपडपट्टीनजीकच्या परिसरात असलेल्या व्यापार्‍यांना फुकट्या भाईंचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फुकट वस्तू न दिल्यास ही भुरटी मंडळी थेट तोडफोड करून नुकसान करीत आहेत. त्यामुळे व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे. गुरुवारी (दि. 25) एकाच दिवशी देहूरोड आणि दापोडी परिसरात दोन घटना घडल्याचे समोर आले आहे.

पहिल्या घटनेत कॅडबरी फुकट न दिल्याने बेकरीची तोडफोड करीत गल्ल्यातील तीन हजार रुपये काढून नेण्यात आले. हा प्रकार दापोडी येथील जयभारत स्वीट येथे बुधवारी (दि. 24) रात्री घडला. याप्रकरणी नरेश गुलाबराव सबनानी (44, रा. काळेवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अब्दूल बबलू शेख ऊर्फ शाहरूख (रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा कामगार बेकरीत काम करीत होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फुकट कॅडबरी मागितली. फिर्यादी यांनी कॅडबरी देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने शिवीगाळ करीत दगडाने बेकरीची काच फोडली. तसेच, फिर्यादी यांना ढकलून देऊन गल्ल्यातील तीन हजार रुपये काढून घेतले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी मिळून कापड दुकानदाराला लुटले. हा प्रकार गुरुवारी (दि. 25) सायंकाळी किवळे येथील वाडी मेन्स वेअर येथे घडला. याप्रकरणी रोहन राजेश देशमुख (22, रा. किवळे) यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रफिक शेख व राकेश तेलगू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून कपडे फुकट देण्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेले आरोपी दुकानावर आले. त्यांनी हाताने फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच, हातातील कोयते हवेत फिरवून दहशत पसरवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुकानातून दोन जिन्स, तीन शर्ट तसेच हप्ता म्हणून एक हजार रुपये घेऊन गेले. या गुन्ह्याचा तपास देहुरोड पोलिस तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्याने व्यापारी वर्गांमध्ये एक प्रकारे दहशत निर्माण झाली आहे.

ऑडिओ रेकॉर्डिंग असलेले सीसीटीव्ही महत्त्वाचे

एखादा भुरटा गुन्हेगार दररोज दुकानात येऊन त्रास देत असल्यास व्यापार्‍यांनी त्याचे पुरावे जमा करून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी दुकानात ऑडिओ रेकॉर्डिंग सुविधा असलेले सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे आहेत. जेणेकरून भविष्यात एखादी घटना घडल्यास किंवा पोलिसांच्या मदतीने भुरट्यांना प्रतिबंध करण्यास फुटेजचा उपयोग होईल.

तक्रार देण्याचे आवाहन

शहरातील व्यापार्‍यांना फुकटे भाई दररोज त्रास देत आहेत. मात्र, नसता पंगा नको, असे म्हणून काही व्यापारी भुरट्या मंडळींना सांभाळून घेतात. तक्रारी येत नसल्याने पोलिसांनाही कारवाई करण्यात मर्यादा येतात. त्यामुळे व्यापार्‍यांनी समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिस मदत घ्या..!

एखादा भुरटा गुन्हेगार दुकानात येऊन त्रास देत असल्यास त्याला विरोध करण्यापेक्षा गुपचूप पोलिस नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. जेणेकरून संबंधित फुकट्या भाईला पोलिस रंगेहात पकडून जेरबंद करतील.

Back to top button