पिंपरी : खिशातून मोबाईल काढल्याने मित्राचा केला डोक्यात दगड घालून खून | पुढारी

पिंपरी : खिशातून मोबाईल काढल्याने मित्राचा केला डोक्यात दगड घालून खून

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मस्करीत मित्राच्या खिशातील मोबाईल काढल्याने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. नारायण वसंत वाघमारे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ भगवान वसंत वाघमारे (३२, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर उर्फ एक्क्या गौतम कसबे (२४, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ नारायण आणि आरोपी अमर हे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास इंद्रायणी नगर येथील यशवंत चौकात गप्पा मारत होते. त्यावेळी नारायण याने मस्करीत अमरच्या खिशातील मोबाईल काढला. याचा राग आल्याने अमर याने नारायणला हाताने मारहाण करीत जमिनीवर पाडले. त्यानंतर डोक्यात दगड घातला. नारायणला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.

Back to top button