Akshaya Tritiya 2024 | वैविध्य अक्षय्य पुण्यसोहळ्याचे | पुढारी

Akshaya Tritiya 2024 | वैविध्य अक्षय्य पुण्यसोहळ्याचे

सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ज्याला महत्त्व आहे, तो सोनेरी दिवस म्हणजे अक्षय्यतृतीया. भारतभर हा दिवस विविध स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी विविध धर्मीयांत आणि प्रांतात निरनिराळ्या परंपरांनी तो साजरा करण्याची प्रथा असली तरी यातील एक साम्य म्हणजे सर्वच धर्मांत आणि प्रांतात तो तितकाच महत्त्वाचा मानला जातो.

भारतीय परंपरेत साजरे होणारे विविध सण-उत्सवांचे जगभरातील संस्कृती अभ्यासकांना नेहमीच अप्रुप वाटत आले आहे. एक तर निर्सगाला धरून तयार केलेले हे सण आणि त्यांचे निसर्ग संवर्धनासाठी किंवा शेतीच्या कामासाठी असलेले महत्त्व यामुळे आपल्या पूर्वजांनी किती खोल विचार केला होता, याची कल्पना येते. विशेष म्हणजे एकच सण भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात निरनिराळ्या नावाने ओळखला जातो आणि त्याची साजरी करण्याची पद्धतही वेगळी आहे; मात्र त्यामागचा विचार समान आहे. हिंदू कालगणनेप्रमाणे वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला येणारा अक्षय्यतृतीया हा सणही असाच महत्त्वाचा आहे. आपल्याकडे मुहूर्तशास्त्रामध्ये वर्षभरातील जे साडेतीन शुभमुुहूर्त सांगितले गेले आहेत, त्यांपैकी एक म्हणजे अक्षय्यतृतीया. ‘अक्षय’ या संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याचा क्षय अथवा अंत होत नाही असा. म्हणून या दिवशी ज्याची सुरुवात होते, ते अक्षय्य किंवा अंतहीन असते, अशीही एक कल्पना आहे.

भारतभर हा दिवस विविध स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी विविध धर्मीयांत आणि प्रांतात विविध परंपरांनी तो साजरा करण्याची प्रथा असली तरी यातील एक साम्य म्हणजे सर्वच धर्मांत आणि प्रांतात तो तितकाच महत्त्वाचा आहे. आनंदाचा आणि सौभाग्याचा असा हा दिवस मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग किंवा मुहूर्त पाहावा लागत नाही. नवीन व्यवसाय, नवीन घर, गृहप्रवेश अशा कोणत्याही गोष्टीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. वर्षभरातला हा सोने खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. हिंदू धर्मात सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्याची पूजाही केली जाते. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले सोने अधिक पवित्र मानले जाते. त्यामुळे सोन्याचा भाव कितीही असला तरी या दिवशी किमान गुंजभर तरी सोने खरेदी केले जाते.

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसर्‍या तिथीला येणार्‍या दिवसाला ‘अक्षय्यतृतीया’ असे संबोधले जाते. या दिवसावर भगवान विष्णू यांचे वर्चस्व असल्याने या दिवशी सोने पूजनाला आणि खरेदीला महत्त्व आहे. तसेच परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. परशुरामांना भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जाते. या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला आणि याच दिवशी स्वर्गातून पवित्र गंगा धरतीवर अवतरली, अशीही एक मान्यता आहे. अक्षय या शब्दाचा अर्थच कायमस्वरूपी, दीर्घायुषी असा आहे. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, हिरे, मोती किंवा स्थावर संपत्तीची खरेदी केली, तर त्यात नेहमी वाढ होत राहते, असा विश्वास आहे. याच दिवशी वेद व्यासांनी श्रीगणेशाला महाभारत सांगायची प्रार्थना केली व त्याच्या लिखाणाला सुरुवात केली होती. सागराकडून जमीन मिळवणार्‍या परशुरामाचा जन्मदिवस असल्याने गोव्यात आणि कोकणपट्टीत या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वैदिक मान्यतेनुसार या दिवशी जो मनापासून दान देतो, त्याला त्याचे इष्ट फळ मिळतेच, असा हिंदू धर्मीयांत द़ृढविश्वास आहे. अक्षय्यतृतीयेला दिवसभर उपवास करण्याचा प्रघात आहे आणि विष्णूंची पूजा करून तांदूळ, मीठ, चिंच, फळे, कापड चोपड, साखर, भाज्या, वार्‍याचे पंखे दान म्हणून देण्याची प्रथा आहे. या दरम्यान जपजाप्य, दानधर्म, पूजाअर्चा, तप, पवित्र स्नान, होमहवन असे पवित्र कार्य केले जाते. थोडक्यात, अधिकाधिक पुण्यकर्म करण्याचा हा काळ आहे. उत्तर भारतात या दिवशी केदारनाथ, बद्रिनाथ आणि चार धाम मंदिरे भाविक यात्रेकरूंसाठी खुली केली जातात. भगवान विष्णू आणि कुबेराच्या सन्मानार्थ या दिवशी बरेचजण दिवसभर उपवास करतात. अन्य प्रांतांप्रमाणेच उत्तर भारतातही या दिवशी अन्नपदार्थ आणि फळांचे दान करण्याचा प्रघात आहे. जाट धर्मीयांत हा दिवस ‘अखा तीज’ या नावाने साजरा केला जातो. परंपरेनुसार या दिवशी घरातला कर्ता पुरुष भल्या पहाटे शेतीची अवजारे घेऊन शेतावर जातो. शेतावर जाताना त्याचा सामना शेत खाणार्‍या पक्ष्यांशी किंवा जनावरांशी झाला तर ते वर्ष पिकपाण्यासाठी शुभ मानले जाते.

व्यापारीवर्गात या दिवसाचे महत्त्व आहे. कोणताही नवा व्यापार-उद्योग सुरू करायचा असेल, तर या दिवसाची निवड केली जाते. दक्षिण भारतात या दिवशी अन्य ठिकाणांप्रमाणेच भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि लक्ष्मी-कुबेर होम केला जातो. हिंदू धर्मीयांप्रमाणे जैन धर्मातही या दिवसाचे महत्त्व मानले जाते. या दिवशी त्यांचा वर्षभराचा उपवास सोडला जातो. अक्षय्यतृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो.

पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीच्या मडक्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट दान केला जातो. असे केल्याने पितरांचा संतोष होतो, असे मानले जाते. एकूणच या सणाशी निगडित विविध प्रथा-परंपरांचा वेध घेतला असता, त्यामध्ये पुण्यकर्म आणि दानधर्म यांना अधिक महत्त्व असल्याचे दिसते.

Back to top button