संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; नव्या राजकीय समीकरणांची चाहूल | पुढारी

संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; नव्या राजकीय समीकरणांची चाहूल

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी काल २६ जानेवारीला तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपला (बीआरएस) हा पक्ष महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ५ फेब्रुवारीला त्यांनी मेळावा आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित केले होते.

नांदेड येथे ५ फेब्रुवारीला होणाऱ्या भव्य मेळाव्यात अनेक नेते व संघटनांचे त्यांच्या पक्षाला समर्थन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यानिमित्त काल (दि.26) के. चंद्रशेखर राव यांनी संभाजीराजे छत्रपती यांना स्नेहभोजनासाठी विशेष निमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांच्यात तब्बल पाच तास चर्चा झाली.

संभाजीराजे छत्रपती हे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यात नवा राजकीय पर्याय उभा करीत आहेत. तसेच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही महाराष्ट्राच्या राजकीय रिंगणात येण्याची धडपड सुरू आहे. के. चंद्रशेखर राव यांचा चेहरा महाराष्ट्रात नवखा असून ते महाराष्ट्रात स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते संभाजीराजे यांच्याकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेशी युती करून के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष महाराष्टाच्या रिंगणात उतरू शकतो. असे झाल्यास राज्याच्या राजकरणाला वेगळे वळण येऊन इतर पक्षांना हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         हेही वाचलंत का ?

Back to top button