डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे व्याख्यान | पुढारी

डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे व्याख्यान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे ‘छत्रपती शिवरायांचे असामान्य जीवन आणि कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवार, दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षानिमित्त युगपुरुष छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा, जाज्वल्य इतिहास पाटील आपल्या खास शैलीत मांडणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. गेल्या 37 वर्षांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत यावर्षी विश्वास पाटील 34 वे पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असतील. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठीतील प्रतिथयश लेखक व भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असलेल्या विश्वास पाटील यांनी मराठी भाषेत विपुल साहित्य लेखन केले आहे. 1980 आंबी (कादंबरी), 1982 मध्ये ‘कलाल चौक’ कथासंग्रह प्रकाशित झाला. 1986 ला चलो दिल्ली (अनुदानित संग्रह), तर 1988 ला ऐतिहासिक कादंबरी ‘पानिपत’ प्रकाशित झाली. त्यानंतर झाडाझडती, क्रांतिसूर्य, लस्ट फॉर लालबाग कादंबरी व रणांगण नाटक त्यांनी लिहिले. त्यांच्या चंद्रमुखी, पांगिरा व महानायक कादंबर्‍यांची हिंदीत भाषांतरे झाली आहेत. ‘पानिपत’ला प्रियदर्शनी पुरस्कार, गोव्याचा नाथ माधव पुरस्कार व कोलकत्ताच्या भाषा परिषदेसह 35 हून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘झाडाझडती’ कादंबरीस 1992 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेक दिनाचे यंदाचे 350 वे वर्ष आहे. यानिमित्त रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती शिवरायांचे असामान्य जीवन आणि कर्तृत्व’ या विषयांतून मांडणार आहेत. या कार्यक्रमास वेळेपूर्वी 15 मिनिटे सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.

Back to top button