कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी - राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

कृषी महोत्सव : पाठिंब्याविषयी लवकरच सांगतो आधी थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी - राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांना पाठिंब्याबाबत मी लवकर सांगतो, मात्र बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. आमच्या पाठिंब्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते काम करतीलच. मात्र, थोरात याबाबत काहीच का बोलत नाही? असा सवाल उपस्थित करत थोरातांवर निशाना साधला आहे.

समर्थ सेवामार्गाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक दौर्‍यावर आलेल्या विखे-पाटील यांनी बुधवारी (दि.25) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या नाकाची गोष्ट बोलण्यापेक्षा स्वत:चे नाक सांभाळावे. राज्यात काँग्रेसची काय अवस्था झाली आहे आधी ते पाहावे, असे विखे-पाटील यांनी टोला लगावला. मंगळवारी (दि. 24) नाशिक दौर्‍यावर असताना देशातल्या सर्वांत मोठ्या पक्षाला नाशिकच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार मिळू शकला नाही हे दुर्दैवी असल्याची टीका करत भाजपचे नाक कापले गेल्याचा टोला त्यांनी लगावला होता. पुढे विखे म्हणाले की, शेतीमाल विकावा लागतो, बाजार समिती साठवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे, असे सल्ला देताना पणन व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे. कृषी आणि पणन विभागांची सांगड घातली गेली पाहिजे. दोन्ही खाते दोन वेगवेगळ्या लोकांकडे असतात, असे त्यांनी म्हटले. राज्यामध्ये साखर कारखान्याचे कर्ज होते. त्यांना मंगळवारी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आणि राज्य सरकारच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीने दिलासा मिळेल. धोरणात बदल होतील. खुल्या बाजारपेठेत साखर विकता येईल. साखर कारखान्याबरोबर प्राथमिक सोसायटीचे काम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या गौणखनिजाबाबत ते म्हणाले की, गौणखनिजाबाबत पुढील आठवड्यात धोरण जाहीर केले जाईल.

हेही वाचा:

Back to top button