वक्फ बोर्डाची बांधकामाला स्थगिती; मुस्लिम नागरिकांच्या तक्रारीची दखल : अनिस सुंडके यांची माहिती | पुढारी

वक्फ बोर्डाची बांधकामाला स्थगिती; मुस्लिम नागरिकांच्या तक्रारीची दखल : अनिस सुंडके यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आमदार रवींद्र धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता बळकावल्याची तक्रार मुस्लिम नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली होती. त्याची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी लक्ष्मी रस्त्यावरील सीटीएस नंबर 966/1 या भूखंडावर चालू असणारे बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती एआयएमआयएम उमेदवार अनिस सुंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना सुंडके म्हणाले, या कामासाठी देण्यात आलेले कमेन्समेन्ट सर्टिफिकेटदेखील ताबडतोब रद्द करण्यात यावे. वक्फ बोर्डाच्या या स्टे आदेशानुसार महापालिकेने हे बांधकाम थांबवावे आणि संबंधितांवर कारवाई करावी. रविवार पेठेतील लक्ष्मी रस्त्यानजीक सीटीएस नंबर 966/1 हा तब्बल एक हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. या मोक्याच्या भूखंडावर प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या भागीदारांनी बेकायदेशीरपणे निवासी व व्यावसायिक कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केल्याची तक्रार करण्यात आली होती.

वक्फ बोर्डाच्या आदेशामुळे कोट्यवधी रुपयांचा भूखंड बळकावण्याच्या धंगेकरांच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे. या भूखंडाचा विक्री व्यवहार कसा झाला, या भूखंडावरील निवासी-व्यापारी कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोणत्या कायद्याने परवानगी दिली, या प्रकरणात कोणत्या अधिकार्‍यांचा सहभाग आहे, या सर्व प्रकाराची आता चौकशी होईल. दोषींना तुरुंगात जावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजाच्या मालकीची कोट्यवधींची मालमत्ता वाचवण्यात यश आल्याचे समाधान असल्याचे सुंडके यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, या संदर्भात रवींद्र धंगेकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला. मात्र तो होऊ शकला नाही.

हेही वाचा

Back to top button