

कोल्हापूर; डी.बी. चव्हाण : केंद्र शासनाच्या इथेनॅाल मिश्रण धेारणामुळे देशातील इथेनॅालचे उत्पादन दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे साखर उद्योगाची आर्थिक तरलता सुधारणा होत आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकर्यांना उसाची बिले वेळेत मिळण्यास चांगलाच हातभार लागत आहे. व्याजाच्या खर्चामध्ये बचत होत आहे; पण साखर कारखान्यांना ऊस गाळप करून त्याची साखर उत्पादित करणे व इथेनॉल उत्पादन घेणे यासाठी जो खर्च येतो तो फारच मोठा आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादन घेणार्या उद्योगाचे अर्थकारण सुधारण्यासाठी इथेनॉलच्या प्रतिलिटर दरात वाढ होणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा साखरतज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी व्यक्त केली.
केंद्र शासनाने 2003 साली 8 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेशांत 5 टक्के इथेनॅाल मिश्रणाच्या कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर सन 2006 मध्ये 21 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत या येाजनेचा विस्तार केला. 2013-14 मध्ये देशात एकूण 38 कोटी लिटर इथेनॅाल पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरले. त्याचे प्रमाण 1.53 टक्के होते. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाऊन गतवर्षी ते 452 केाटी लिटरपर्यंत वाढले. केंद्र सरकारने इथेनॉल पेट्रोलमध्ये 10 टक्के प्रमाणे मिश्रणाचे उद्दिष्ट जून 2022 मध्ये पूर्ण केले. आता सन 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॅाल मिश्रणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी इथेनॉल उद्योगाला शाश्वती मिळणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.