कोल्हापूर : गॅस पाईपलाईनमुळे पाणी पाईपलाईन फुटल्या | पुढारी

कोल्हापूर : गॅस पाईपलाईनमुळे पाणी पाईपलाईन फुटल्या

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : शहरातील ग्राहकांना पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहराच्या काही भागांत पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा सुरू झाला आहे; पण ज्या पाईपलाईन टाकण्यात आल्या त्या टाकताना पिण्याच्या पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्या आहेत; तर काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, या पाईपलाईन बदलण्याचा भुर्दंड आता महापालिकेला बसणार आहे.

घरात गॅस सिलिंडर असणे हे एकेकाळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. शहरी भागात गॅस सिलिंडरचे प्रस्थ असायचे; पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली आणि ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचे लोण पसरले. घरात गॅस आला, तरी ग्राहकांच्या डोक्यावरचे टेन्शन काही कमी झाले नाही. गॅस सिलिंडरला नंबर लावणे, नंबर लावूनही दोन-तीन दिवस गॅस मिळत नसायचा, गॅस आला की नाही याची खातरजमा करणे, आपल्या वेळेत गॅस सिलिंडर मिळाले नाही म्हणून स्वतः सिलिंडर आणायला जाणे, यासाठी अनेकवेळा तासन्तास रांगेत उभा राहायला लागण्याचे प्रकार सर्वच ग्राहकांनी अनुभवले आहेत. महापुराच्या काळात तर ग्राहकांना गॅससाठी वणवण भटकावे लागत होते.

अखेर या सर्वातून कोल्हापूरकरांची सुटका झाली. गेल कंपनीद्वारे हिंदुस्थान पेट्रोलियम, ऑल इंडिया यांच्याकडून पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्याच्या कामाला सुरुवात झाली. या योजनेला महापालिकेने हिरवा कंदील दिल्यानंतर शहरातील बहुतांश भागांत घराघरांत पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले. कोल्हापूर शहरातील अनेक भागांत गॅसच्या पिवळ्या रंगाच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या; पण या पाईपलाईन टाकताना योग्य ती दक्षता घेतली गेली नसल्याचे दिसून आले.

शहराच्या अनेक भागांत महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईनलाईनवरूनच गॅस पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. यासाठी खोदाई करताना नागरिकांच्या पाईपलाईन फुटल्या आहेत; तर काही ठिकाणी त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नेमकी गळती कुठे आहे, याचा शोध घेताना महापालिकेला हा प्रकार उघडकीस आला आहे. राजारामपुरी परिसरात अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. याची दुरुस्ती करण्याला महापालिका तयार नाही. दौलतनगर, शाहूनगर भागात पाईप फुटल्याने ड्रेनेज पाणी मिसळत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, याला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेचा बेजबाबदारपणा

गॅस पाईपलाईन टाकताना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी किंवा संबंधित कर्मचार्‍यांनी त्यांना पाण्याच्या पाईपलाईन कुठे आहेत, हे सांगणे आवश्यक होते; पण अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गॅस पाईपलाईन पाहिजे तशा टाकण्यात आल्या. सध्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे अन्य विभागांची चार्ज आहे. या कामातून त्यांना डोके वर काढायला वेळ नाही. त्यामुळे कुठे काम सुरू आहे, कसे काम चालले आहे, याची त्यांना काहीच माहिती नाही. आता नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर हे प्रकार उघडकीस येत आहेत.

Back to top button