पी एन पाटील हे महाराष्ट्रातील निष्ठेचे मानदंड : बाळासाहेब थोरात | पुढारी

पी एन पाटील हे महाराष्ट्रातील निष्ठेचे मानदंड : बाळासाहेब थोरात

कौलव; पुढारी वृत्तसेवा : सत्ता असो वा नसो आ. पी एन पाटील यांनी तत्व व निष्ठेशी कधीच तडजोड केली नाही. काँग्रेस पक्ष, गांधी-नेहरू घराणे आणि सर्वसामान्य जनतेशी असणारे निष्ठा ही अखंड देशात प्रसिद्ध होती. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात निष्ठेचे मानदंड म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या जाण्याने जिल्हा पोरका झाला असून त्यांचे कार्य पुढे चालवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे असे भावपूर्ण उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. आज सडोली खालसा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत आ. पी एन पाटील यांचे रक्षाविसर्जन करण्यात आले. यावेळी थोरात बोलत होते.

आमदार पाटील यांचे काल निधन झाल्यानंतर त्यांचे जन्मगाव असलेल्या सडोली खालसा (ता. करवीर) येथे त्यांच्या पार्थिवावर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले होते. आज सकाळी रक्षा विसर्जन करण्यात आले. यावेळी राज्याच्या राजकीय क्षेत्रातील प्रमुख नेत्यांसह पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. यावेळी पाटील यांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला.

यावेळी पाटील यांना श्रद्धांजली वाहताना बाळासाहेब थोरात यांनी पी एन पाटील व स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे जिवाभावाचे नाते होते त्यांच्या सोबतच माझाही स्नेह होता तो आम्ही अखेरपर्यंत सांभाळला. पी एन यांची काँग्रेस पक्षावर आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यावर असणारी निष्ठा ही भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहे. आजच्या राजकारणात दररोज विविध पक्षात उड्या मारणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, संपूर्ण आयुष्यभर तत्व व निष्ठेशी तडजोड न करता संघर्ष करत पी एन यांनी कोल्हापूर व महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. आगामी काळात त्यांची मुले राजेश पाटील व राहुल पाटील यांना आम्ही पाठबळ देऊ असे थोरात यांनी सांगितले.

यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आमची जडणघडण झाली. किंबहुना त्यांचा आम्हाला मोठा आधार होता. त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे काँग्रेस पक्षासह जिल्ह्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. पाटील यांची मुले राजेश व राहुल यांच्या पाठीशी सर्व ताकद ठामपणे उभा केली जाईल व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष भक्कमपणे कार्यरत राहील असे सांगितले.

यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पी एन पाटील यांच्यासारखा नेता कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला हे खऱ्या अर्थाने येथील जनतेचे भाग्य आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कदापिही भरून येणार नाही असे सांगून छत्रपती घराण्याचे व त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते त्यांनी अखेरपणे जोपासले होते. आमच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे असे सांगितले.

भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी खऱ्या अर्थाने मिळाली. त्यांच्या पाठबळा मुळेच भोगावती साखर कारखाना सुरळीत चालला आहे. मात्र भावी काळात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली उणीव जाणवणारा असून जिल्हा बँकेतील सर्वच नेते मंडळींनी आ. पाटील यांच्याप्रमाणे आमच्या कारखान्याला पाठबळ द्यावे असे सांगितले.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर आर के पोवार, स्थायी समिती माजी सभापती राजू लाटकर, माजी सभापती राजू सूर्यवंशी, बी के डोंगळे, सातारा जिल्हा काँग्रेसचे वतीने प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने संजय कुर्डूकर, यांनी श्रद्धांजली वाहीली .

यावेळी श्रीमंत शाहू महाराज, आ . विश्वजित कदम , विशाल पाटील( सांगली) माजी आमदार के पी पाटील , संजयसिंह घाटगे, मालोजीराजे छत्रपती, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, ‘गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे संचालक विश्वासराव पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील , बयाजी शेळके, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आ .पाटील यांचे पुत्र राजेश पाटील व राहुल पाटील यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले
राजेश व राहुल काळजी करू नका

आ. थोरात व सतेज पाटील यांनी स्वर्गिय पी एन पाटील यांनी काँग्रेसच्या अडचणीच्या काळात जिल्ह्यात पक्ष वाढवला . त्यांच्या कर्तृत्वाची नोंद राज्य व राष्ट्रीय पातळीवर आहे. सत्ता असो वा नसो लाखावर कार्यकर्त्यांचे पाठबळ त्याच्या पाठीशी होते. आगामी काळात राजेश पाटील व राहुल पाटील यांच्या पाठीशी सपूर्ण ताकद उभी करून त्यांना पाठबळ देणार आहोत त्यामुळे राजेश व राहुल यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आश्वस्त केले.

Back to top button