कुरुंदवाड : जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी; एक लाख 11 हजारांचा मुद्देमाल लंपास | पुढारी

कुरुंदवाड : जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी; एक लाख 11 हजारांचा मुद्देमाल लंपास

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील माळभागा येथील भर वस्तीत असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स मध्ये तीन चोरट्याने फ्लॅटमध्ये घुसून महिलेचे तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन दोन तोळ्याची चेन, रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा 1 लाख 11हजार रुपयांचा  मुद्देमाल लंपास केला. भर दिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेत पोलिसांनी सी.सी.टीव्ही चे फुटेज तपासले. यामध्ये तीन चोरटे कैद झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. या चोरीची फिर्याद सुनिता राजेंद्र कापसे यांनी दिली आहे. इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
महाराणा प्रताप उद्यानासमोर भर वस्तीत व नेहमी वर्दळ असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राजेंद्र कापसे यांचे कुटुंब राहत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने तेथे भाड्याने राहत आहेत. शुक्रवारी सुनिता कापसे या घरी एकट्याच होत्या. त्यांचा मुलगा अशीश हा पुणे येथे आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात युवकांनी कापसे यांच्या घरी येऊन तुमच्या मुलाचे मित्र आहे असे सांगून घरात प्रवेश केला. आतून दरवाजा बंद करून सुनिता कापसे यांचे तोंड बांधून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दोन तोळ्याची चेन तिजोरीतील रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरीची घटना शहरात वाऱ्यासारखे पसरताच घटनास्थळी बघ्घ्यानी मोठी गर्दी केली होती.
भर वस्तीत दिवसा-ढवळ्या चोरीची घटना घडल्याने शहरात घबराट निर्माण झाली आहे. सपोनी रविराज फडणीस यांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान करत पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेले चोरटे इचलकरंजीच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आल्याने शिरढोण-टाकवडे येथील सी.सी.टीव्ही फुटेजची रात्री उशिरा तपासणी सुरू होती.लवकरच या चोरट्यांना त्यांच्या मुस्क्या आवळून जेरबंद करू असे सपोनि फडणीस यांनी सांगितले आहे.

Back to top button