कोल्हापूर : हातकणंगले बीडीओंच्या आश्वासनानंतर ‘पुरोगामी’ पदाधिकाऱ्यांचे उपोषण मागे | पुढारी

कोल्हापूर : हातकणंगले बीडीओंच्या आश्वासनानंतर 'पुरोगामी' पदाधिकाऱ्यांचे उपोषण मागे

हातकणंगले: पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील मिणचे ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांचा निधी दुसरीकडे वळवून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप करत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.  गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

मिणचे ग्रामपंचायतीने वार्षिक वसुलापैकी पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करावयाचा असतो. परंतु, तसे न करता गेली पाच वर्ष सदर विकास निधी मागासवर्गीयांच्यासाठी न वापरता इतरत्र वापरून भ्रष्टाचार झाला. या प्रकरणी पुरोगामी संघर्ष परिषदेने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून निदर्शने केली होती. मात्र, ग्रामपंचायतीने याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे गटविकास अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

दरम्यान, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सर्वच मागण्या पूर्ण करण्याचे व गेल्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या उपस्थित उपोषण मागे घेण्यात आले. गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांचे हस्ते लिंबू सरबत देऊन आमरण उपोषण मागे घेतले.

यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख दौलत घाटगे, कोल्हापूर जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे, हातकणंगले तालुकाध्यक्ष रवींद्र हंकारे , हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे, कोल्हापूर जिल्हा संघटक प्रशांत जाधव, बाजीराव घाटगे राज्य उपाध्यक्ष सुनीता खटावकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन आवळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्षा राधा कांबळे, वैशाली कांबळे, मोहसीन मुजावर, संभाजी चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :  

Back to top button