पुढारी ऑनलाईन डेस्क : सणांचा राजा म्हणून दिवाळ सणाकडे पाहिले जाते. छोट्यांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण सकारात्मक उर्जा घेवूण येणाऱ्या या सणाची वाट पाहत असतो. धनत्रयोदशीपासून या सणाला सुरुवात होते. त्यानंतर नरक चतुदर्शी, लक्ष्मी कुबेर पूजन, भाऊबीज आणि दीपावली पाडवा साजरा केला जातो. या आनंदोत्सवात नाती दिवसागणीक अधिक वृद्धींगत होत राहतात. चैत्यनाचा, आनंदाचा, उत्साहाचा, सकारात्मक उर्जेचा, मानवी हितसंबंध जपणारा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते.मुख्यत: म्हणजे या सणात पदार्थांची रेलचेल असेलेला फराळ (Diwali Faral) केला जातो. वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात; पण तुम्हाला माहित आहे का? फराळ कधी सुरु झाला आणि का झाला. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
कृषी संस्कृतीमध्ये आहार आणि सण यांचे एक समीकरण आहे. आपल्याकडे सणांनुसार आहारामधील विविधता आढळते. दिवाळी सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल असते. पूर्वीच्या काळी आपल्या आहारात गोड पदार्थांची संख्या अत्यल्प होती. दिवाळी सणात लाडूंचे विविध प्रकार, करंजी, बालूशाही, अनारस अशा गोड पदार्थांनी तोंड 'गोड' करत हा सण साजरा केला जातो. दिवाळीतील गोड पदार्थ या सणांचा आनंद द्विगुणीत करतात.
भारतात सर्वत्र दिवाळी सण साजरा होताे;पण प्रदेश आणि भौगोलिकतेनुसार त्याचे स्वरुप वेगवेगळे आपल्याला जाणवते. पावसाळा संपला की शेतातील नवीन पिके घेतल्यानंतर शरद ऋतूत आणि आश्विन आणि कार्तिक (मराठी) महिन्याच्या दरम्यान (ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान) हा सण येतो.
Diwali Faral : महाराष्ट्र, दिवाळी आणि शेतीसंस्कृती
आपल्या महाराष्ट्रातील बरेच सण हे इथल्या शेतीभातीशी जोडले गेलेले आहेत. दिवाळी सणही आपल्या शेतीसंस्कृतीशी जोडला गेला आहे. हे आपल्याला विवीध लोकगितांतून, ग्रथांतून समजून येते. उदा.
दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या.
गाई म्हशीने भरले वाडे. दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो.
अशा ओव्यातून वा गाण्यांतून दिवाळी बद्दल माहिती मिळते.