कोल्हापूर : शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची साथ, टाळेबंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे 2019-20 या आर्थिक वर्षात अनेक शेतकर्‍यांना पीक कर्जाची उचल करता आली नव्हती. या शेतकर्‍यांनी एप्रिल ते जून 2020 या कालावधीत कर्ज घेतले; पण 2019-20 या आर्थिक वर्षात कर्ज घेऊ न शकलेले अनेक शेतकरी हे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत मिळणार्‍या प्रोत्साहनपर लाभापासूनदेखील वंचित राहू नयेत, या आ. हसन मुश्रीफ यांच्या मागणीला सहकार विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने प्रामाणिक शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 15 सप्टेंबरपासून याचा लाभ मिळणार आहे.

सरकारी योजनेनुसार 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षांत कर्ज घेतलेले आणि मुदतीत परतफेड करणारे शेतकरी पात्र ठरणार होते; मात्र कोरोना संकटाच्या काळात 2019-20 मध्ये अनेक शेतकर्‍यांना कर्जच उचलता आले नाही. अशा शेतकर्‍यांनी त्यापूर्वीच्या दोन वर्षांत घेतलेले कर्ज आणि त्याची मुदतीत केलेली परतफेड हा निकष लावण्यात यावा, अशी मागणी आ. मुश्रीफ यांनी विधिमंडळात केली होती.

यावर सहकारमंत्र्यांनी 2017-18 पासूनच्या तीनपैकी कुठल्याही दोन आर्थिक वर्षांत हा निकष पूर्ण करणार्‍या शेतकर्‍यांना योजनेतील प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल, असे स्पष्ट केले. पीक कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.

Back to top button