इचलकरंजी महापालिकेसाठी मोर्चेबांधणी | पुढारी

इचलकरंजी महापालिकेसाठी मोर्चेबांधणी

इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : इचलकरंजी महापालिकेची निवडणूक कशी होणार, हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पक्षीय पातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप- ताराराणी आघाडीला सत्तेबाहेर ठेवायचे, या इराद्याने स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा, बैठका सुरू झाल्या आहेत. सर्व विरोधकांना एकाच छताखाली आणण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या मँचेस्टर आघाडीने साद घातली आहे. यास काँग्रेस, राष्ट्रवादी, डाव्यांनी प्रतिसाद दिल्यास सत्ताधारी भाजप-ताराराणी आघाडीची चांगलीच कोंडी होणार आहे.

मागली पाच वर्षांत सत्ताधारी भाजपने बहुमत राखण्यासाठी राष्ट्रवादी, शाहू आघाडी, ताराराणी आघाडी यांना परिस्थितीनुसार सोबत घेऊन पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पहिल्यांदा माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली. जांभळे-हाळवणकर यांच्यात वितुष्ट आल्याने आता नव्याने स्थापन झालेल्या मँचेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके, प्रकाश मोरबाळे यांचे सूत जुळले; मात्र अंतिम टप्प्यात हा संसारही टिकला नाही.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे आ. आवाडे गट व राष्ट्रवादीतील मदन कारंडे गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. या संपूर्ण राजकीय घडामोडीत काँग्रेसचे निष्ठावंत नगरसेवक मात्र अलिप्त राहिले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाने येथील दुसर्‍या फळीतील काँग्रेस नेतृत्वाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बदलत्या राजकीय स्थित्यंतराचे इचलकरंजीच्या राजकारणावर परिणाम जाणवलेले आहेत.

आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हाळवणकर-आवाडे युती होणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. तर दुसर्‍या बाजूला आवाडे यांची ताराराणी आघाडी आणि भाजप एकत्रित निवडणुका लढवणार, असे गृहीत धरूनच राजकीय जोडण्या सुरू झाल्या आहेत. यासाठी मँचेस्टर आघाडी सक्रिय झाली आहे. काँग्रेसलाही अस्तित्व राखण्यासाठी आघाडी करावी लागणार, ही वस्तुस्थिती आहे. उर्वरित शिवसेनेचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे मँचेस्टर आघाडीचे प्रयत्न सत्यात उतरण्याची शक्यता गडद आहे.

राष्ट्रवादीतील वाद संपणार कधी?

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ इचलकरंजीत आले होते. यावेळी जांभळे-कारंडे गटाने वाद संपवण्याची मानसिकता बोलून दाखवली आहे. आ. मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची असून, हे दोन्ही गट ऐन निवडणुकीत एकत्रित येणे हे राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र करण्याचे शिवधनुष्य आ. मुश्रीफ कसे पेलतात, यावरच शहरातील राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे.

Back to top button