Loksabha election | बारामती शहर, तालुक्यात पैशांचा पाऊस! दुष्काळात अनेकांना लक्ष्मीचा आधार | पुढारी

Loksabha election | बारामती शहर, तालुक्यात पैशांचा पाऊस! दुष्काळात अनेकांना लक्ष्मीचा आधार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा मतदानाच्या अगोदरच्या रात्री सोमवारी (दि. 6) आणि मंगळवारी (दि. 7) मतदानादिवशी बारामती शहर व तालुक्यात पैशांचा धुरळा झाला. ऐन दुष्काळी स्थितीत हाती आलेली लक्ष्मी अनेकांना आधार देऊन गेली.
पैसे वाटप झाल्याच्या तक्रारी पार पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्या. शहरातील काही भागात सोमवारी रात्री पैसे वाटपावरून दोन गटांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. एका गटाकडून पैसे वाटप होत असताना दुसरा गट सजग राहिल्याने हा प्रकार बाहेर आला. त्याचे व्हिडीओ तयार करून मध्यरात्रीपासूनच समाजमाध्यमांवर फिरविण्यात आले. या सगळ्याचा परिणाम काही भागांमध्ये मंगळवारी दिसून आला. तिकडे दिलेत मग आम्हाला का नाही, जोपर्यंत आमच्यापर्यंत कोणी येत नाही, तोपर्यंत मतदानाला बाहेरच पडायचे नाही, असा पवित्रा काहींनी घेतला.

तर पैसे मिळालेल्या मतदारांनी कशाला सोडायचे, ते काय कष्टाचे देतात का, पैसे देऊ द्या नाही तर काही देऊ द्या, आम्ही आमचे मत कोणाला द्यायचे हे ठरवलेय, त्याप्रमाणेच करणार, अशा प्रतिक्रिया दिल्या. बारामती शहर व तालुक्यातील मतदारांनी यंदा पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी लोकसभा निवडणूक पाहिली. यापूर्वी लोकसभा निवडणुका नेहमीच एकतर्फी होत आल्या. यंदाची निवडणूक पूर्णतः वेगळी व ‘काटे की टक्कर’ असणारी पाहायला मिळाली. त्यात मतदारांना चांगले दिवस आले. गेल्या 15 दिवसांपासून शहर, तालुक्यात जेवणावळी सुरू आहेत. एकही आचारी जेवण बनविण्यासाठी मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. हॉटेलातील जेवणांसाठी थेट कुपन सिस्टीम राबविण्यात आली, त्यामुळे मतदारांची चंगळ झाली.

शरद पवार गटाकडून तक्रार

शहरातील काही भागात पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार सोमवारी रात्री 11 वाजता शरद पवार गटाकडून शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली. या गटाचे शहराध्यक्ष संदीप गुजर यांनी ही तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातही गाव नेत्यांनी नंतर आपल्यावर शेकायला नको, या भावनेतून मतदानाच्या आदल्या रात्री हात ढिल्ला सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ही निवडणूक लोकसभेची की ग्रामपंचायतीची असा प्रश्न सजग मतदारांना पडल्यावाचून राहिला नाही.

हेही वाचा

Back to top button