सुळेतील एकाच कुटुंबातील तिघांचा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

सुळेतील एकाच कुटुंबातील तिघांचा नदीत बुडून मृत्यू

ऐनापूर, पुढारी वृत्तसेवा : धुणे धुण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आजरा तालुक्यातील हारूर-गजरगावदरम्यानच्या बंधार्‍यालगत ही घटना घडली. मृतांमध्ये सुळे (ता. आजरा) येथील सख्ख्या भावांसह मुलाचा समावेश आहे. याच कुटुंबातील दुसर्‍या मुलाला वाचविण्यात यश आले आहे. अरुण बचाराम कटाळे (वय 52), उदय बचाराम कटाळे (49), जयप्रकाश अरुण कटाळे (14) अशी मृतांची नावे आहेत. कर्ते पुरुष गेल्याने कटाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची आजरा पोलिसांत नोंद झाली आहे.

सुळे गावची लक्ष्मी यात्रा नुकतीच पार पडली होती. यात्रेनंतर घरातील अंथरुण धुण्यासाठी अरुण व उदय हे बंधू मुलांसह हारूरलगतच्या बंधार्‍यालगत गेले होते. अरुण यांचा मुलगा जयप्रकाश व उदय यांचा मुलगा ऋग्वेद (15) पोहण्यास उतरले होते. काही वेळानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले गटांगळ्या खात असल्याचे निदर्शनास आले. जयप्रकाश व उदय यांनी आरडाओरड करत मुलांच्या दिशेने पाण्यात उडी मारली. त्यांनी आपापल्या मुलांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्यांना मिठी मारल्याने त्यांना वाचविणे कठीण झाले. त्यामध्ये चौघेही बुडाले.

दरम्यान, येथील आरडाओरड ऐकून अंकुश चव्हाण या तरुणाने धाव घेत नदीत उडी मारली. यावेळी ऋग्वेद त्याच्या हाती लागताच त्याने आपल्या दिशेने खेचून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी गेल्याने ऋग्वेद हा बेशुद्ध झाला होता. छाती व पोटावर दाब देऊन पाणी काढल्यावर तो शुद्धीवर आल्यावर त्याला दवाखान्यात पाठविण्यात आले. हा प्रकार कळताच अन्य ग्रामस्थांनीही धाव घेतली. त्यानंतर बंधार्‍यात बुडालेल्यांचा शोध घेतला असता तासाभरात उदय व अरुण यांचे मृतदेह हाती लागले. तर लहानग्या जयप्रकाशचा शोध लागला नव्हता.

नुकतेच प्रकल्पातून नदीपात्रात पाणी नदीत सोडले असल्याने पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी प्रवाहातून त्याचा मृतदेह वाहून गेल्याची शक्यता व्यक्त झाली. त्यामुळे त्याच्या शोधासाठी गडहिंग्लज येथील पास रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघे बुडाल्याचे समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. कटाळे कुटुंबीयांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा मन हेलावणारा होता. दोन्ही मुलांसह नातवाला गमावल्याने आई, वडिलांची तर पतीला गमावल्याने दोन्ही सुनांची अवस्था न पाहवणारी होती.

Back to top button