वेल्हेत जिल्हा बँकेच्या शाखेने केला रात्रीचा दिवस : शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल | पुढारी

वेल्हेत जिल्हा बँकेच्या शाखेने केला रात्रीचा दिवस : शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करत कामकाजाची वेळ संपल्यावरही सोमवारी (दि. 6) सायंकाळी पाचपासून मंगळवारी (दि. 7) सकाळी आठपर्यंत वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्रभर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने वेल्हे राजगडसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या फिर्यादीवरून बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश तेलावडे यांच्याविरोधात वेल्हे पोलिसांनी भा.दं.वी. 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 7) मतदान असल्याने सोमवारी (दि. 6) सायंकाळपासून रात्रभर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वेल्हे, पानशेतसह लहान-मोठ्या गावात वर्दळ सुरू होती. कोणी कोणाकडे किती पैसे दिले, पैसे न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज अशा चर्चा गावोगाव सुरू होत्या. त्याच वेळी वेल्हे बुद्रुक येथील जिल्हा बँकेची शाखा रात्री 12 वाजता सुरू असल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला. याची दखल घेत निवडणूक आयोगाच्या जलद देखरेख
पथकाने तातडीने वेल्हे येथील बँकेत धाव घेतली.

बँकेला पोलिस छावणीचे स्वरूप

दरम्यान, वेल्हे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला मंगळवारी दुपारपासून पोलिस छावणीचे रूप आले होते. तपासासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत येथे तळ ठोकून होते.

हेही वाचा

Back to top button