कोल्हापूर : सर्पदंश झालेल्या धुंदवडेतील ओंकारची मृत्युशी झुंज ठरली अपयशी | पुढारी

कोल्हापूर : सर्पदंश झालेल्या धुंदवडेतील ओंकारची मृत्युशी झुंज ठरली अपयशी

कौलव; पुढारी वृत्तसेवा : धुंदवडे पैकी चौधरीवाडी (ता. गगनबावडा) येथे मंगळवारी (दि.१९) मध्यरात्री झोपेत असतानाच सर्पदंश झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ओंकार पांडुरंग भोपळे (वय २२) या तरुणाची मृत्युशी तीन दिवस चाललेली झुंज अखेर संपुष्टात आली. एकुलत्या एक असणाऱ्या ओंकारच्या दुर्देवी जाण्याने धामणी खोरा हळहळत आहे.

चौधरीवाडी येथील ओंकार भोपळे हा मंगळवारी रात्री जेवण करुन झोपला असता मध्यरात्री त्याला अंथरुणातच मण्यार जातीच्या सर्पाने त्याचा कडकडून चावा घेतला होता. सर्पदंश होताच ओंकारला नातेवाईकांनी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारासाठी त्याला एका खासगी दवाखान्यात हलवावे लागले होते.

डॉक्टरांनी ओंकारला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्याची मृत्युशी चाललेली झुंज अखेर संपली. ओंकार हा एकुलता एक मुलगा होता. शांत व मन मिळावू असणारा ओंकार धुंदवडे येथे चिकन व मटणाचे दुकान चालवत होता. त्याला दोन बहिणी आहेत. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. घराला हातभार लावणाऱ्या ओंकारच्या दुर्देवी मृत्युमुळे धामणी खोऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button