रेंदाळ बँकेचा इचलकरंजी शाखाधिकारी गायब | पुढारी

रेंदाळ बँकेचा इचलकरंजी शाखाधिकारी गायब

रेंदाळ : पुढारी वृत्तसेवा :  येथील आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेत दीड कोटीचा अपहार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात लेखापरीक्षकांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू असून अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपहार प्रकरणातील मुख्य संशयित इचलकरंजी शाखा व्यवस्थापक रयाजी पाटील चार दिवसांपासून गायब झाल्याने अपहार प्रकरणाचे गूढ वाढलेे आहे.

शेअर मार्केट, जमीन खरेदी यामध्ये पैसे गुंतवून झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने हा प्रकार केल्याचे उघडकीस येत आहे. आठ दहा दिवसांपूर्वी त्याच्याकडून 60 लाख रुपये वसूल करून घेतले आहेत; मात्र आता तो व्यवस्थापक गायब झाल्याने बँक प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाखा मॅनेजरला त्याच्या अधिकाराखाली 2 लाखांपर्यंत कर्ज मंजूर करण्याचे अधिकार दिले आहेत. याचा फायदा घेऊन त्याने आपले नातेवाईक यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरण व सोनेतारण दाखवून अंदाजे दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठेवीदार व सभासद यांच्यात खळबळ उडाली आहे.

अपहाराची ही घटना बँकेला काळिमा फासणारी आहे. यापूर्वी त्याच्याकडून 60 लाख वसूल केले आहेत. ऑडिट पूर्ण झाल्यावर अंतिम रकमेचा आकडा सिद्ध झाला की त्या व्यवस्थापकावर फौजदारी दाखल करणार आहे.

काही कर्मचार्‍यांचाही सहभाग

गेल्या वर्षी ते सहा महिन्यांपासून या घडामोडी घडत असाव्यात. या घटनेत इचलकरंजी शाखेत काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांशी संगनमत केल्याची चर्चा आहे. यामध्ये किती कर्मचारी सहभागी आहेत, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

– अरुण महाजन,
अध्यक्ष, रेंदाळ बँक

Back to top button