मोदी-शहांकडून महाराष्ट्राची लूट : उद्धव ठाकरे

मोदी-शहांकडून महाराष्ट्राची लूट : उद्धव ठाकरे
Published on
Updated on

धुळे: पुढारी वृत्तसेवा
इंडिया आघाडीची सत्ता केंद्रात येणारच असून बिळात लपलेल्या रेवण्णांसारख्या व्यभिचाऱ्यांना शेपट्या धरुन बिळातून बाहेर काढणार आहोत. मोदी-शहांनी लुटलेल्या महाराष्ट्राचे वैभवही आम्ही परत मिळवून देणार आहोत. भाजपची ही मस्ती गाडून टाकण्यासाठी इंडिया व महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.

इंडिया व महाविकास आघाडीच्या धुळे मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी धुळे येथील जेलसमोरील मैदानावर सभा झाली. सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. डॉ. शोभा बच्छाव या धुळ्याच्या उद्याच्या खासदार आहेत, हे आजच्या गर्दीने सिध्द केले असा दावा करत ठाकरे यांनी मोदी यांना आपल्या भाषणात लक्ष्य केले. धुळ्याच्या जनतेने भाजपचा नाकर्तेपणा पाहिला. केंद्रात मंत्री असलेल्या डॉ. सुभाष भामरे व भाजपने धुळ्याची धुळधाण करुन टाकली. पाण्याअभावी धुळ्याचे रखरखीत वाळवंट झाले आहे. धुळ्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दु: खी आहे. गुजरातची कांद्यावरील निर्यातबंदी मोदी उठवितात आणि महाराष्ट्राशी मात्र भेदभाव करतात. हाच महाराष्ट्र आता भाजपला दिल्ली पाहू देणार नाही, कारण त्यांनी शेतकर्‍यांशी गद्दारी केली आहे. बहीण भावाच्या नात्याला बदनाम करण्याची संस्कृती भाजपाची आहे. व्यभिचारी, बलात्कारी प्रज्वल रेवण्णासाठी मोदी मते मागतात, हे भाजपचे संस्कार आणि संस्कृती आहे. इंडिया आघाडीची सत्ता केंद्रात बसणार आहे. त्यामुळे बिळात लपलेले रेवण्णासारखे व्यभिचाऱ्यांना शेपट्या धरुन बिळातून बाहेर काढणार आहोत. याच महाराष्ट्राने दोनदा 40 पेक्षा जास्त जागा भाजपला दिल्या. त्यामुळे यांना पंतप्रधान पदावर बसता आले. पण आता हाच महाराष्ट्र त्यांना सत्तेवरून खाली खेचणार असल्याचा दावा ठाकरे यांनी यावेळी केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली. पण आता दोन गुजराती महाराष्ट्र लुटत आहेत .पण महाराष्ट्रात पराक्रम शिल्लक आहे. पाठीवर वार करणाऱ्यावर वाघनख वापरले जाते. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने मतदान करताना एका बोटाचा वापर करून हुकूमशहाला गाडण्यासाठी समर्थ आहे, अशी वज्रमुठ आवळली पाहिजे. महाराष्ट्रामधील सर्व 48 जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे. चार जून रोजी महाविकास आघाडी सत्तेत येताच सुरतमध्ये जाऊन त्यांना बिळामधून खेचून बाहेर काढू, असे आव्हान देखील त्यांनी दिले.

दरम्यान, इंडिया आघाडीला मिळणार प्रतिसाद पाहून भाजप व मोदींच्या पायाखालची वाळू सरकु लागल्याने ते बेभान होवून खोटे आरोप करत आहेत. आता नरेंद्र मोदींची झोला लेके आऐ थे, झोला लेके जाएंगेची वेळ आली असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आपल्या भाषणात दिला. सभेत महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, उमेदवार शोभा बच्छाव, माजी आ. अनिल गोटे, महेश मिस्त्री आदींची भाषणे झाली.

सभेला संपर्कप्रमुख अशोक धात्रक, आ. नरेंद्र दराडे, काँग्रेस जिल्हाध्रकक्ष शामकांत सनेर, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, माजी आ. डि. एस. अहिरे, शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे, माजी आ. प्रा.शरद पाटील, महेश मिस्त्री, हेमंत साळुंखे, हिलाल माळी, धीरज पाटील, सौ. शुभांगी पाटील, डॉ. अनिल भामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. भामरेही गद्दारच निघाले
धुळे लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवार नव्हता. तेव्हा डॉ. सुभाष भामरे शिवसेना सोडून भाजपकडून उभे राहिले आणि खासदार झाले. त्यामुळे तेही गद्दारच निघाले. केंद्रात मंत्रीपद भोगले, पण डॉ. भामरे आणि भाजपच्या नाकर्तेपणामुळे धुळ्याची पूर्णपणे धुळधाण झाल्याची टिका ठाकरे यांनी यावेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news