तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांना एक्झिटचा पर्याय; मल्टिपल एंट्री आणि एक्झिटची अंमलबजावणी होणार | पुढारी

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांना एक्झिटचा पर्याय; मल्टिपल एंट्री आणि एक्झिटची अंमलबजावणी होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्न वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबवणार्‍या संस्थांमध्ये प्रथम वर्ष उत्तीर्ण केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रम सोडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य मंडळाकडून येत्या 20 जूनपर्यंत लिंक उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. चितलांगे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून के. स्किमअंतर्गत पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुधारित करून प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम राबविण्यास सुरू केला आहे.

सध्या व्दितीय वर्षांचा अभ्यासक्रम तयार करण्याचे कार्य सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अनुषंगाने इच्छुक विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मंडळाशी संलग्न वास्तुशास्त्र व अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबविणार्‍या सर्व पदविका संस्थांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ तयार करीत असलेल्या के. स्किमच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रथम वर्षानंतर पदविका अभ्यासक्रम सोडू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यानंतर लर्निंग असेसमेंट स्किम फॉर वन इयर एक्झिट कोर्स लागू राहील. विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष उत्तीर्ण करणे आणि 4 आठवड्यांची आंतरवासिता पूर्ण करणे बंधनकारक राहील.

तसेच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सोडत असलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन प्रदान करण्यात येईल.
मंडळाच्या संकेतस्थळावर लर्निंग असेसमेंट स्किम फॉर वन इयर एक्झिट कोर्सची लिंक 20 जून 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत सर्व प्राचार्य, संस्थाप्रमुख यांनी शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करून सविस्तरपणे संस्थेतील सर्व विभागप्रमुख तसेच अधिव्याख्याता यांना याबाबत पूर्णपणे माहिती द्यावी. तसेच विद्यार्थ्यांकरिता औद्योगिक प्रशिक्षणाबाबत औद्योगिक क्षेत्र ठरविण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्याची असेल यांची नोंद घेण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button