नाशिकच्या आखाड्यातील १४ उमेदवार राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार | पुढारी

नाशिकच्या आखाड्यातील १४ उमेदवार राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदार संघात सध्या दोन-तीन राजकीय पक्षांच्याच उमेदवारांची चर्चा होत असली तरी, नाशिकच्या रिंगणात तब्बल ३१ उमेदवार उतरले आहेत. यातील १४ उमेदवार तर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत. बहुतांश नाशिककर या उमेदवारांबाबत सोडाच पण पक्षाच्या नावाबाबतही अनभिज्ञ असल्याने, या उमेदवारांना स्वत:च्या नावाबरोबरच पक्षाचे नाव मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, नाशिकमध्ये चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी, महायुती, वंचित आणि एका अपक्ष उमेदवारामध्ये थेट लढतीची सध्या चर्चा आहे. मात्र, याव्यतिरिक्त इतरही राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात असल्याने त्यांचा प्रभाव किती असेल याविषयी आता चर्चा रंगत आहे. नाशिकच्या आखाड्यात शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट आणि वंचित या पक्षांच्या उमेदवारांचा सध्या बोलबाला आहे. या व्यतिरिक्त एक अपक्ष उमेदवारही चर्चेत आहे. मात्र, या चौघांव्यतिरिक्त इतर दहा राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे उमेदवार मैदानात असले तरी, त्यांच्याबाबत फारसा बोलबाला नसल्याचे चित्र आहे. कुठल्याही उमेदवारासाठी निवडणूक लग्न घराप्रमाणे असते. दिवस निघाल्यापासून ते रात्र होईपर्यंत उमेदवाराच्या अवतीभोवती तसेच घरी आणि प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांचा गोतावळा असतो. मात्र, या दहा पक्षांच्या उमेदवारांबाबत असे चित्र क्वचितच बघावयास मिळत आहे. काही उमेदवारांनी तर एकट्यानेच प्रचार सुरू केला आहे. दिवस निघाल्यानंतर दुचाकीवर आपल्या निशाणीचे फलक घेवून हे उमेदवार प्रचारासाठी निघत आहेत. काहींनी तर शेवटी-शेवटी प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या उमेदवारांचे निवडणूकीतील भवितव्य काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या पक्षांचे उमेदवार
‘बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया, आम जनता पार्टी (इंडिया), सैनिक समाज पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, भारतीय अस्मिता पार्टी, धर्मराज्य पक्ष’ आदींचे उमेदवार नाशिक लोकसभेच्या रिंगणात आहेत.

Back to top button