कोल्हापूर : यड्राव येथे दीड वर्षाच्या मुलीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके | पुढारी

कोल्हापूर : यड्राव येथे दीड वर्षाच्या मुलीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके

यड्राव (जि. कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : यड्राव येथील रेणुका नगरमध्ये पटांगणात खेळणाऱ्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केले. भटक्या कुत्र्यांनी तिचे डोके, मान व डाव्या हाताच्या दंडाचे लचके तोडून गंभीर जखमी केले.

मनस्वी अक्षय गायकवाड (वय दीड वर्षे) असे तिचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास यड्राव येथील रेणुकानगर दक्षिण भागात घडली.

रक्तबंबाळ अवस्थेतील बालिकेला उपचारासाठी इचलकरंजीतील विविध हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारास असमर्थता दर्शवली. यामुळे शेवटी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. इतक्या लहान बालिकेचे कुत्र्याने तोडलेले लचके पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मनस्वी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घराजवळील पटांगणात खेळत होती. यादरम्यान भटक्या कुत्र्यांचा समूह तेथे आला. त्यातील एका कुत्र्याने मनस्वीच्या मानेचा चावा घेतला. कुत्र्याने डोक्याचे व डाव्या हाताच्या दंडाचे लचके तोंडले. यामुळे आरडाओरडा झाला.

काही क्षणातच ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी तिथे धाव घेतली. कुत्र्याच्या तावडीतून बालिकेला सोडविले. या हल्ल्यामुळे बालिका गंभीर जखमी झाली होती.

ग्रां. पं.सदस्य प्रदीप पाटील यांच्यासह मुलीचे नातेवाईक व नागरिकांनी जखमी मनस्वीला इचलकरंजी येथील काही खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. मात्र प्रत्येक हॉस्पिटलने उपचारासाठी असमर्थता दर्शवली.

रक्‍तबंबाळ अवस्थेतील बालिकेवर इचलकरंजीत उपचार होत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर भटकी कुत्री, डुकरे, कचरा उठाव आदी समस्यांकडे ग्रामपंचायत गांभीर्याने पहात नसल्यामुळे असे प्रसंग घडत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मुंबईजवळ वसलेल्या सोंडाई गडाची सफर

Back to top button