

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासह परिसराला सोमवारी दुपारी वादळाने तडाखा दिला. यानंतर वळवाने झोडपले. जोरदार वार्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. घरे, शाळांवरील पत्रे उडून गेले. वडणगेजवळ तीन मोठी होर्डिंग्ज कोसळली. वीज तारा तुटल्या. कुशिरे-जोतिबा मार्गावर देवदर्शनासाठी चाललेल्या रायगड जिल्ह्यातील भाविकांच्या चारचाकीवरच झाड कोसळल्याने चौघेजण जखमी झाले. वडणगे फाटा तसेच रजपूतवाडी ते कोतोली फाटा या मार्गावर झाडे पडल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील वाहतूक चार तासांहून अधिक काळ ठप्प झाली.
शहरात सकाळपासून हवेत उष्मा होता. काही काळ उकाड्याची तीव्रताही वाढली. दुपारी दोन वाजल्यापासून वातावरण ढगाळ होत होते. काही काळ वातावरण इतके काळेकुट्ट झाले होते की, भर दुपारीच सायंकाळ झाल्यासारखी परिस्थिती झाली होती. यानंतर दुपारी तीन वाजता जोरदार वार्यासह पावसाला सुरुवात झाली. शहरातील रमणमळा, न्यू पॅलेस परिसरासह शिंगणापूर, हणमंतवाडी, वडणगे आदी परिसरालाही वादळी वार्याने जोरदार तडाखा दिला. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली. ताराबाई पार्कातील हिंदमाता नगर, महावीर कॉलेज, न्यू पॅलेस रोडसह सिद्धार्थ नगर, शुक्रवार पेठ, सुतार मळा, अंबाई टँक, फुलेवाडी सहावा बसस्टॉप, पंचगंगा स्मशानभूमी आदी ठिकाणी झाडे पडली. सिद्धार्थनगर येथे झाड पडल्याने दुचाकी आणि चारचाकीचे नुकसान झाले. ही झाडे हटवण्यासाठी अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. न्यू पॅलेस परिसरात घरे, शेडवरील पत्रे उडून गेले. एका घरावरील पत्रे तर थेट काही अंतरावरील इमारतीच्या दुसर्या मजल्यावर जाऊन पडले होते. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. शिवाजी पुलावरील विजेचा खांबही पडला. काही ठिकाणी वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
शहरात झालेल्या पावसाने नागरिकांसह भाविक, पर्यटकांचे हाल झाले. शहराच्या मध्यवर्ती भागासह पश्चिमेकडील परिसराला पावसाने झोडपले. अंबाबाई मंदिरात दर्शनरांगेत उभारलेल्या भाविकांची चांगलीच पळापळ झाली. पावसाने बाजारपेठांवरही परिणाम झाला. सुमारे अर्धातासानंतर पाऊस थांबला. यानंतर वातावरण पुन्हा निरभ्र होत गेले.
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर वडणगे फाट्याजवळ मोठे झाड पडले. त्यापाठोपाठ केर्ली ते कोतोली फाटा या मार्गावर ठिकठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या पडल्या. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूला चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. यामुळे दसरा चौकातून पन्हाळ्याकडे जाणारी वाहतूक कसबा बावडा-शिये मार्गाने वळवण्यात आली. यामुळे घराकडे जाणार्या प्रवाशांचे हाल झाले. वडणगे येथील स्मशानभूमीचे शेडही उडून गेले.
पोहाळे तर्फ आळते : वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे कुशिरे – जोतिबा मुख्य रस्त्यावर मोटारीवर झाड कोसळून चौघे जण जखमी झाले. सुलोचना मनोहर कुंभार (वय 73), मनोहर सुंदर कुंभार (75), ज्योती चिंतामणी कुंभार (55) व चौथ्या जखमीचे नाव समजू शकले नाही. चालक दिगंबर चंद्रकांत पोवार हेही किरकोळ जखमी झाले.
जखमीना सी. पी. आर.मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडीमध्ये चालकासह पाच महिला व दोन पुरुष होते. झाडाच्या ओझ्याने छत खाली दबल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि जोराचा पाऊस सुरू झाला. यावेळी ही घटना घडली.
रायगड जिल्ह्यातून मोटारीने (एम एच 46 बी झेड 9092) एकाच कुटुंबातील सहा जण जोतिबा दर्शनाला आले होते. सायंकाळी दर्शन घेऊन ते कोल्हापूरकडे जात असताना अचानक वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला. याच दरम्यान कुशिरे हद्दीत मुख्य रस्त्याकडेला असलेले जुनाट व मोठ्या आकाराचे करंजीचे झाड गाडीच्या टपावर कोसळले. यात मागील बाकावर बसलेल्या तीन महिला व एक पुरुष
जखमी झाले. झाड गाडीच्या छतावर मागील बाजूला कोसळले. अचानक झाड कोसळल्याने आतील प्रवासी शीटवरून खाली सरकून वाकून बसले. त्यामुळे त्यांना मोठी इजा झाली नाही.
कुशिरे येथील स्थानिक रहिवाशी नाना माने यांनी ही घटना पाहिली व त्यांनी आरडाओरडा करून शेजारी असलेल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी बोलावून घेतले. नागरिकांनी गाडीचा दरवाजा उचकटून प्रवाशांना बाहेर काढले व रुग्णवाहिका बोलावून सी. पी. आर.ला पाठवले.
कोडोली पोलिस ठाण्याचे स.पो. नि. कैलाश कोडग, हवालदार मधुकर परीट, प्रशांत संकपाळ, दत्तात्रय हारुगाडे, कॉन्स्टेबल अभिजित पाटील, रवी माने यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारसाठी पाठवून अपघातग्रस्त गाडी रस्त्यातून बाजूला घेतली.
दरम्यान, कुशिरे-पोहाळे रस्त्यावर बाळासो पाटील यांच्या शेतातील रस्त्याकडेचे जांभळीचे झाड रस्त्यावर कोसळले. या ठिकाणीसुद्धा काही काळ वाहतूक खोळंबली होती. जे. सी. बी.च्या साहाय्याने व नागरिकांच्या मदतीने ते झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोहाळे-गिरोली रस्त्यावर पोहाळे येथील दुर्गामाता चौकाजवळ निलगिरीचे झाड दुचाकीवर पडल्याने त्यात दुचाकीचे नुकसान झाले.
शिंगणापूर : शिंगणापूर, हणमंतवाडी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वार्यासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने घराचे पत्रे उडाले, विद्युत पोलसह काही झाडे कोसळली.
शिंगणापूर विद्यानिकेतन प्रशालेचे पत्र्याचे शेड उडून रस्त्यावर पडले. हणमंतवाडी येथील अनेक घरांचे पत्रे उडाले. अनेक कॉलनीमधील विद्युत पोल पडले आहेत. खांडसरी शेजारी झाड पडून वाहतूक कोंडी झाली आहे.
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले परिसरात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता सोसाट्याच्या वार्यासह सुमारे अर्धा तास वळवाचा पाऊस झाला. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
या परिसरात गेली पंधरा दिवस वळवाचा पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता. आजच्या पावसाने शेतकर्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला.
शिरोली दुमाला : दिवसभराच्या उन्हाच्या तडाख्यानंतर सोमवारी दुपारी वळीव पावसाने हजेरी लावली. तुळशी खोर्यातील शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, मांडरे, चाफोडी, गर्जन, आरळे, घानवडे येथे अर्ध्या तासभर झालेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला. भर दुपारीच वळीव पाऊस आल्याने ग्रामीण भागात शेतकर्यांची शेतकामाची घाई उडाली. तसेच मका, सोयाबीन सारखे उन्हात वाळत घातलेले धान्य गोळा करताना महिलांसह पुरुषांची धावपळ उडाली. जोरदार वळीव पाऊस झाल्याने मुख्य रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. गटारी ओसंडून रस्त्यावरून पाणी वाहत होते. शिरोली दुमाला येथे तर गटारीतून वाहून आलेला कचरा, प्लास्टिक यांचा मुख्य रस्त्यावरच खच पडला होता.
कसबा बीड : जोराचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह करवीर तालुक्यात वळवाच्या पावसाने दमदार एन्ट्री केली. दुपारी साडतीनच्या सुमारास वळवाच्या पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास झालेल्या दमदार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. जोरदार वार्यामुळे झाडांच्या फांद्या -पाने मोठ्या प्रमाणात तुटून पडली आहेत. तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. ऐन हंगाम तोंडावर समाधानकारक वळवाचा पाऊस झाल्यामळे उभ्या ऊस पिकाला व शेती मशागतीच्या कामांना पोषक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.
पन्हाळा : पन्हाळा पंचक्रोशीमध्ये सोमवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पन्हाळा येथे महाजन यांच्या परसबागेत असणार्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाला आग लागली. पन्हाळा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पालिका कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून ही आग विझवली.
जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरावर अखेर वरुणराजा बरसला. विजांचा कडकडाट आणि जोरदार वार्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे जोतिबा मंदिरसह गुलालमय झालेली सर्व शिखरे व परिसर धुऊन निघाला. तासाहून अधिक लागलेला पावसाच्या सरींनी परिसर थंड झाला. वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांचे मांडव, छत कोलमडून पडले.