मुले आणि ऑनलाईन गेम्स

मुले आणि ऑनलाईन गेम्स
Published on
Updated on

दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच केंद्र सरकारला सांगितले की, मुलांना ऑनलाईन गेमिंगच्या सवयीपासून दूर करण्यासाठी एक राष्ट्रीय धोरण तयार करण्याच्या मागणीविषयी निर्णय घ्यावा.

वस्तुतः ऑनलाईन गेम खेळण्याची मुलांना लागलेली सवय ही आता विस्तृत समस्या बनत चालली आहे आणि त्यामुळे पालकांची चिंता वाढत चालली आहे. शाळा बंद असल्यामुळे इंटरनेटच्या जंजाळात मुले गुंतून पडत असून, त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वेगाने धावणार्‍या आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा वाढता हस्तक्षेप आपल्या राहणीमानापासून विचार करण्याच्या स्वरूपापर्यंत अनेक बाबतीत मोठे बदल घडवून आणत आहे. या धावपळीत लोक आधुनिक तंत्रज्ञानाने युक्‍त उपकरणांचा वापर करताना असाही विचार करत नाहीत की, त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल आणि दीर्घकाळात त्यातून काय निष्पन्‍न होईल? गेल्या सुमारे दीड वर्षापासून महामारीमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीने शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत आणि जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचे शिक्षण इंटरनेटच्या साह्याने ऑनलाईन झाले आहे.

अर्थातच, यामुळे पूर्वी ज्याप्रमाणे कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा अतिवापर मुलांनी करणे पालक टाळत असत, ते आता होत नाही आणि मुले या वस्तूंचा मुक्‍तपणे वापर करतात. या उपकरणांच्या माध्यमातून मुलांचा प्रवास शिक्षणापुरता किंवा हलक्या-फुलक्या मनोरंजनापुरता मर्यादित राहिला असता, तर फारसा फरक पडला नसता. परंतु, इंटरनेटवर असलेले ऑनलाईन गेम्स आणि मुलांच्या हाती लागू नये, अशी अन्य काही सामग्री आता मुक्‍तपणे मुलांच्या हाती पडत आहे आणि आता या गोष्टींची मुलांना सवय लागल्याचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत.

या समस्येच्या पार्श्‍वभूमीवरच दिल्ली उच्च न्यायालयाने मागील बुधवारी केंद्र सरकारला सांगितले की, मुलांना ऑनलाईन गेमिंगच्या सवयीपासून दूर करण्यासाठी एक राष्ट्रीय धोरण तयार करण्याच्या मागणीविषयी निर्णय घ्यावा. वस्तुतः ऑनलाईन गेम खेळण्याची मुलांना लागलेली सवय ही आता विस्तृत समस्या बनत चालली आहे आणि त्यामुळे पालकांची चिंता वाढत चालली आहे.

दीड-दोन वर्षांपूर्वी मुले जेव्हा टीव्ही, कॉम्प्युटर किंवा स्मार्ट फोनमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वेळ घालवत असत तेव्हा पालक त्यांना त्यापासून परावृत्त करू शकत होते. परंतु, आता शाळांमधील नियमित शिक्षण बंद झाल्यामुळे मुलांना सातत्याने घरातच राहावे लागत आहे. नातेवाईक, ओळखीचे लोक आणि मित्रांशीही भेटण्या-बोलण्याजोगी परिस्थिती नाही. अशा स्थितीत स्वतःला गुंतवून ठेवण्याचा इंटरनेट हा एकमेव सोपा मार्ग मुलांना दिसत आहे.

आज इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड प्रमाणात झाला आहे की, एकीकडे मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहेत, तर दुसरीकडे अत्यंत नकारात्मक अशा असंख्य बाबी मुलांच्या हाती सहजपणे लागत आहेत. या अत्यंत नुकसानकारक आणि मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर प्रचंड परिणाम करणार्‍या बाबी आहेत. आवश्यक सल्ला किंवा मार्गदर्शन मिळत नसल्याने मुले ऑनलाईन गेम्स आणि इंटरनेटवरील अन्य घडामोडींमध्ये रमत आहेत. या जंजाळात ही मुले जर एकदा अडकली, तर त्यांना बाहेर काढणे जिकिरीचे होऊन बसेल. त्यामुळे या समस्येवर सर्वांनी मिळून तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील.

अनेकदा आपल्याला अशा बातम्या ऐकायला मिळतात की, मुलांनी ऑनलाईन जुगारात बरेच पैसे उधळले. काही वेळा पालकांनी जास्त वेळ इंटरनेट गेम खेळायला बंदी केली म्हणून मुलांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारल्याच्याही घटना घडतात. अशा घातक घटना अद्याप अगदीच घराघरात घडत नसल्या, तरी इंटरनेटच्या दुनियेत प्रमाणापेक्षा जास्त काळ अडकून राहिल्यामुळे मुलांच्या नाजूक मनावर आणि मेंदूवर सखोल आणि नकारात्मक परिणाम होत आहेत, हे मात्र खरेच आहे. काळाने केलेल्या आघातामुळे लोकांचा सामाजिक परीघ संकोचला असून, आपले कुटुंब आणि मुलाबाळांपर्यंतच अनेकांची दुनिया सीमित झाली आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक गंभीर परिणाम लहान मुलांवरच होत आहे. इंटरनेटच्या खोट्या, आभासी दुनियेत शिरलेल्या मुलांची आणि युवकांची वास्तव दुनियेपासून दूर पळण्याची मानसिकता बनत आहे. समस्यांशी दोन हात करण्याऐवजी आभासी दुनियेच्या जंजाळात आपल्या रितेपणाची झोळी भरण्याचा उपाय शोधण्याची सवय त्यांना जडते. परंतु, त्यांच्या या सामान्य वाटणार्‍या कृत्यांचे रूपांतर सवयीत, व्यसनात कधी होते, हे लक्षात येत नाही आणि असा बदल घडल्यास त्यातून मुलांना बाहेर काढणे अत्यंत अवघड असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विशेषतः इंटरनेटशी संबंधित साधनांनी लोकांचे जीवन अधिक सोपे आणि सुखकर केले आहे, यात शंका नाही; परंतु या साधनांचा वापर विवेकाने आणि सकारात्मक करणे अखेर प्रत्येक व्यक्‍तीच्याच हाती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news