अन् कापडाच्या ताग्याने शाहू मिल पुन्हा सजली | पुढारी

अन् कापडाच्या ताग्याने शाहू मिल पुन्हा सजली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा शाहू मिल म्हटले की, आजही डोळ्यांसमोर येते ते 200 हून अधिक यंत्राच्या खडखडाटातून घडी होऊन समोर येणारे कापड. कार्डिर्ंंग, वार्पिंग, सायजिंग, बिमिंग आदी विविध 14 विभागांतून कापूस ते कापड असा दररोजचा हा मिलमधला प्रवास काळाच्या ओघात थांबला. त्यामुळे दररोज या मिलच्या आवारात असलेला कापडाचा सहवासही थांबला.

मात्र, 19 वर्षांनंतर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शनिवारी शाहू मिलमध्ये कापड जत्रेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे का होईना, बर्‍याच वर्षांनी शाहू मिलमध्ये वेगवेगळ्या ब—ँडच्या कापडाचे तागे दिसले. या कापड जत्रेचे उद्घाटन माजी खासदार संभाजीराजे व संयोगिताराजे यांच्या हस्ते, तर मौसमी आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

व्यापार, उद्योगाला चालना देण्याबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी शाहू छत्रपती मिलची उभारणी केली. शाहू महाराजांनी मिलची मालकी स्वतःकडे न ठेवता करवीर संस्थानकडे ठेवली. शाहूराजांचा हा वेगळा पैलू यातून दिसून येतो. या ठिकाणी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक व्हावे, स्मारकामध्ये टेक्स्टाईलचे एक दालन असावे, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

कापड जत्रेतील कापडाचा पोत आणि उत्तम दर्जा पाहून असे कापड आपल्या जिल्ह्यात निर्माण होते याचा कोल्हापूरकर म्हणून आपल्याला अभिमान आहे, अशी भावना संयोगिताराजे यांनी व्यक्त केली. नागरिकांनी कापड जत्रेस भेट देऊन आवश्य खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर आहे. इथे तयार होणार्‍या विविध प्रकारच्या कपड्यांमुळे कापड व्यवसायात इचलकरंजीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे मत मौसमी आवाडे यांनी व्यक्त केले.

कापड जत्रेमध्ये 30 हून अधिक स्टॉल असून यामध्ये 20 उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. कापड जत्रेत रेडिमेड शूटिंग, शर्टिंग, रेडिमेड गारमेंट, होजिअरी असे प्रकार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली. कापडाचे अनेक प्रकार पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध ग्रुप आणि नामवंत उद्योजकांनी आपले स्टॉल लावले आहेत. यावेळी संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, उदय गायकवाड, ऋषीकेश केसकर, जयदीप मोरे उपस्थित होते.

घाऊक किमतीत कापड खरेदीचा लाभ घ्या

या जत्रेमध्ये अत्यंत चांगले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कापड फॅक्टरीच्या व घाऊक दरात उपलब्ध असल्याची माहिती ग्राहकांनी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी. लग्नासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी भेटवस्तू म्हणून कापड खरेदीची ही एक चांगली संधी आहे. अधिकाधिक ग्राहकांनी कापड जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

हेही वाचलतं का?

Back to top button