कोल्हापूर : डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करणार
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री कै. डॉ. ग. गो. पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीचे बांधकाम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा मानस आहे. यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. शिवाजी विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनामध्ये शनिवारी सकाळी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
सुरुवातीला पालकमंत्री पाटील यांनी डॉ. ग. गो.जाधव अध्यासनाच्या इमारत बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला. यावर्षी 1 कोटी रुपये मिळाले आहेत. इमारत बांधकाम करताना डबल पार्किंगसह इतर गोष्टींचा विचार करावा. जिल्हा नियोजन समितीतून इमारतीच्या पुढील बांधकामासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही. परंतु, बांधकामाच्या प्लॅनसह खर्चाचे व्यवस्थित नियोजन करावे.
इमारतीच्या पुढील भागातील लँडस्केपिंगचा आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. याप्रसंगी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी आतापर्यंत झालेल्या बांधकामासह इतर गोष्टींची माहिती देत सादरीकरण केले. डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, डॉ. ग. गो. जाधव अध्यासन हे देशातील पत्रकारितेचे पहिले अध्यासन आहे. या ठिकाणी देशभरातील नवनवीन कोर्सेस सुरू करता येतील, याचा विद्यापीठाने विचार करावा. येणार्या काळात इतर विद्यापीठांशी सामंजस्य करार करता येतील, यासाठी प्रयत्न करावेत.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी डॉ. ग. गो. जाधव अध्यासनामार्फत नवीन कोर्सेस सुरू करण्यास अधिकार मंडळाने मान्यता दिली आहे. वर्षभरापर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही. एन. शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. के.पाटील, शाखा अभियंता अनिता पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव, बांधकाम व्यावसायिक बापू लाड, ठेकेदार सुनील नागराळे, विद्यापीठाचे उपकुलसचिव रणजित यादव यांच्यासह विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाबाबत 13 मे रोजी पुन्हा बैठक
पालकमंत्री पाटील यांनी आढावा बैठकीत डॉ. ग. गो. जाधव अध्यासन इमारतीच्या बांधकामाचा आराखडा नव्याने सादर करावा, तांत्रिक कमिटीबरोबर याबाबतची चर्चा करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केल्या. पुढील आठवड्यात 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यापीठात बैठक घेऊन पुढील नियोजन केले जाईल, असेही ते म्हणाले.

