कात्रजच्या तलावांतील मैलामिश्रित पाणी रोखणार : महापालिका आयुक्तांचे आश्वासन | पुढारी

कात्रजच्या तलावांतील मैलामिश्रित पाणी रोखणार : महापालिका आयुक्तांचे आश्वासन

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : ‘कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलाव आणि नानासाहेब पेशवे तलावातील मैलामिश्रित पाणी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील. तसेच मांगडेवाडीला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीतील गाळ काढण्यासह इतर कामेही लवकरच केली जातील,’ असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्‍या कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ. भोसले यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह कात्रज भागाची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते.

‘कात्रज तलावाचे रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढून त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढविल्यास व जलशुद्धीकरण केल्यास आसपास असणार्‍या गावांचा पाण्याचा तीव्र प्रश्न मार्गी लागू शकतो,’ या आशयाचे निवेदन गजराज सोशल फाउंडेशनने महापालिका प्रशासनाला दिले होते. तसेच, प्राणिसंग्रहालायातील तलावात सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळे लेकटाऊन आणि आजूबाजूच्या सोसायट्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही मतदान का करावे? अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही तलाव, एसटीपी पंपाच्या कामाची पाहणी करून अंतिम टप्प्यात असलेले काम तातडीने करण्याचे आदेश या वेळी आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

सोपानकाकानगर, खोपडेनगर येथील पाणीपुरवठ्याची परिस्थिती जाणून घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष तांदळे, दिनकर गोजारे, उपायुक्त अविनाश सपकाळ, ललित बेंद्रे, काशिनाथ गांगुर्डे, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेश गुर्रम, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त हेमंत किरुलकर, गजराज फाउंडेशनचे महेश धूत आदी या वेळी उपस्थित होते.

कात्रज येथील दोन्ही तलावांतील दूषित पाणी रोखण्याबाबत लवकरच योग्या त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच मांगडेवाडीला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीतील गाळ देखील तातडीने काढून परिसरातील पाण्याची समस्या सोडवली जाईल.

– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका

हेही वाचा

Back to top button