सातारा : वीज चोरी पकडल्याच्या रागातून सहायक फौजदाराची अभियंत्याला मारहाण | पुढारी

सातारा : वीज चोरी पकडल्याच्या रागातून सहायक फौजदाराची अभियंत्याला मारहाण

सातारा; पुढारी वृत्तसेवा : हॉटेलची वीज चोरी रोखण्यास गेलेल्या सहायक अभियंत्याच्या अंगावर धावून जात हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या हॉटेल मालक तथा वरळी येथील सहायक फौजदार यांच्यावर वीज चोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गिरवी, ता. फलटण शाखेचे सहायक अभियंता भरत भोसले हे मंगळवार, दि. 3 रोजी गिरवीतील हॉटेल निशांतची वीज चोरी पकडण्यासाठी गेले होते. या हॉटेलसाठी विजेच्या तारेवर आकडा टाकून वीजचोरी सुरू असल्याचे अभियंता भोसले यांच्या निदर्शनास आले. यानंतर भोसले यांनी आकडा काढून पुढील कारवाईसाठी शाखा कार्यालयाकडे जात असताना हॉटेल मालक दीपक सोपान निकाळजे तिथे आले. त्यांनी भोसले यांची गाडी अडवून त्यांना गाडीबाहेर खेचून आकडा का पकडला म्हणून शिवीगाळ सुरू केली. ‘तू गिरवीत पाय ठेवून दाखव, तुझे हात-पाय तोडेल. तुला जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणत धक्काबुक्की व दमदाटी केली. अभियंता भोसले यांनी वीज चोरी पकडणे माझे काम आहे, असे वारंवार सांगत होते. परंतु, निकाळजे याने काहीएक न ऐकता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. निकाळजे हा वरळी पोलीस ठाण्यात सहा. फौजदार पदावर कार्यरत असल्याचे समजते.

कायद्याच्या रक्षकाकडूनच वीज चोरीचा गुन्हा होत असल्याने व ते रोखण्यास गेल्यास अटकाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत भरत भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निकाळजे यांनी 1 हजार 279 युनिट विजेची चोरी केली आहे. तसेच त्यांना 19 हजार 94 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात धमकावणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Back to top button