प्रकाश आबिटकर महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाची जबाबदारी घेणार का ? | पुढारी

प्रकाश आबिटकर महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाची जबाबदारी घेणार का ?

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : भाजप- सेना युती सरकारच्या काळात माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यात आणलेल्या निधीवर आपले नाव लावण्यासाठी श्रेयवादाचा आटापिटा केलात, पण आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निपाणी – राधानगरी रस्त्याच्या दुर्दशेची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर टाकून सरकार पक्षाचे आमदार म्हणून तुमची जबाबदारी झटकू नका, असे प्रत्युत्तर भाजपचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांना दिले. मुरगूड येथे आमदार आबिटकर यांनी निपाणी- राधानगरी रस्त्याच्या दुर्दशेचे खापर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर फोडले. त्याला नाथाजी पाटील यांनी आदमापूर येथे पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.

नाथाजी पाटील पुढे म्हणाले की, रस्त्याचा दर्जा तपासण्याच्या नावाखाली निपाणी- राधानगरी, गारगोटी -कोल्हापूर, गारगोटी- शिवडाव, या रस्त्यावर आपल्या गाडीत दर्जा तपासणीचे मशिन घेऊन फिरत होतात. पण हे दर्जा तपासणीची मोहीम आचानक थांबवली, हे इथल्या जनतेला अजूनही कळले नाही. ही मोहीम अचानक थांबवून आपण हे रस्ते चांगले असल्याचे जणू प्रशस्तीपत्रकच या सार्वजनिक विभाग आणि कंत्राटदाराला दिले आहे. याचे नेमके गौडबंगाल काय ?

आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजारांची कर्जमाफी दिली नाही. सरकारच्या घटक पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी, म्हणून आंदोलनाला बसलेत. त्यावर काही निर्णय होत नाही, मतदारसंघातील वासनोली धरणगळती बाबत आपण एक आवक्षरही काढत नाही. उलट धरणस्थळावर जाऊन ठेकेदाराची पाठराखण करता, त्याला काम चांगले असल्याचे प्रशस्तीपत्र देता, वीज बिलाची वसुली होत नाही, म्हणून वीज तोडा, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत देतात, अशावेळी आपण काय बोलत नाही.

देवेंद्र फडणवीस सरकारने २o१९ च्या महापुराची नुकसान भरपाई ९५० रुपये प्रति गुंठा दिली. ठाकरे सरकारने ती १३५ रूपये प्रति गुंठा दिली, यामुळे शेतकऱ्यांची सोसायटी ही अजून भागली नाही. यावर आपण आवाक्षरही काढत नाही. ही जनतेची होत असलेली दुर्दशा आपणास दिसत नाही का? आणि निपाणी राधानगरी रस्त्याच्या दुर्दशेचे खापर आपण दादांच्या वर फोडता म्हणजे ‘आपले ठेवा झाकून आणि दुसऱ्याचे बघा वाकून’ अशी तुमची गत झाली आहे, असा टोला पाटील यांनी आमदार आबिटकर यांना लगावला.

निपाणी – राधानगरी रस्त्याच्या दुर्दशेबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आमदार आबिटकर (Prakash Abitkar) यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली मुदाळतिट्टा येथे रास्ता रोको आंदोलन करावे. सामाजिक प्रश्न म्हणून राधानगरी भुदरगड कागल तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते तुमच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मोठया संखेने सहभागी होतील, असे आवाहनही पाटील यांनी केले.

यावेळी अलकेश कांदळकर, ज्येष्ठ नेते लहुजी जरग, सुभाष जाधव, दीपक शिरगांवकर, महेश पाटील, संतोष पाटील, नामदेव चौगले, रणजित आडके, राहुल चौगले, सुशांत मांगोरे, संतोष बरकाळे, राम पाटील, संजय भोसले, सुनिल इंगवले आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button