जळगावात केळी उत्पादक शेतकऱ्याची १ लाखाची फसवणूक | पुढारी

जळगावात केळी उत्पादक शेतकऱ्याची १ लाखाची फसवणूक

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : केळी उत्पादक शेतकऱ्याकडून माल खरेदी करून १ लाख ८ हजारांची फसवणूक (fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरूद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भोकर येथील रहिवासी रतीलाल दगा पाटील (वय ६५) हे वास्तव्यास असून ते शेती करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांची भोकर शिवारातील गट नंबर ४३९ येथे असलेल्या शेतीत त्यांनी केळीची लागवड केली होती. गावातील सुरेश बाळू पाटील यांनी त्यांच्या ओळखीतील रावेर तालुक्यातील सावदा येथील व्यापारी जयराम श्यामलाल पुरभी यास केळी विकत देण्याचे रतिलाल पाटील यांना सांगितले.

त्यानुसार व्यापारी जयराम पुरभी यांनी रतीलाल पाटील यांचा विश्वास संपादन करुन ४ व ५ डिसेंबर २०२१ यादरम्यान रतीलाल पाटील यांच्या शेतातील ३७ टन ८२० किलो एवढी केळी ३५० रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकत घेतली. शेतकर्‍याकडून खरेदी केलेल्या केळीच्या मोबदल्यात व्यापारी पुरभी याने रतिलाल पाटील यांना १ लाख ८ हजाराचा कोरा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश वटला नाही चेकचा अनादर झाला. यानंतरही तब्बल दोन ते तीन महिन्यांपासून रतिलाल पाटील यांनी व्यापार्‍याकडे पैशांसाठी तगादा लावला. मात्र, त्या व्यापार्‍याकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती.

आपली फसवणूक (fraud) झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी रतिलाल पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुरेश भादू पाटील व व्यापारी जयराम श्यामलाल पूरभी (रा. सावदा ता. रावेर) या दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button