

सोलापुर, पुढारी वृत्तसेवा : रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसमुळेच देशात आतंकवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार आणि गरिबी निर्माण झाली, असा घणाघाती आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केला. सोलापुरात महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
या सभेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, सोलापूरकरांनो तुमचे एक मत जर चुकीच्या दिशेने गेले तर देशात पुन्हा आतंकवादाला चालना मिळेल, मात्र नरेंद्र मोदींना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. त्यामुळे काँग्रेसची मनसुभे उधळून लावा पुन्हा मोदींच्या हातात देश द्या, असे आवाहनही त्यांनी केले. राम जन्मभूमी आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो, अयोध्येतील राम मंदिर समस्त हिंदूंचे शक्तिस्थान आहे, भीमराव आंबेडकर यांचे संविधान, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा पंतप्रधान मोदी मध्ये आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित केले आहे, फटाके जरी वाजले तर पाकिस्तान म्हणतो, आम्ही काही केले नाही, आता काँग्रेसच्या हातातील देश राहिला नाही, पाकिस्तानवर आपली एवढी दहशत निर्माण केली आहे. देशातील शेतकरी आत्मनिर्भर होतील, श्रमिक व्यवस्थित जीवन जगतील, महिला सुरक्षित राहतील, युवक योग्य मार्गावर चालतील हेच मोदींचे ध्येय आहे. बारा कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला तसेच दोन कोटी घरात उज्वला योजनेतून गॅस दिले, त्यामुळे नव्या आणि विकसित भारताची सुरुवात झाली आहे, अयोध्येत काँग्रेसवाल्यांनी राम मंदिर बनवले असते का? रक्ताचे पाट वाहतील असे म्हणत होते, आजपर्यंत एक मच्छर पण नाही मेला, सात वर्षात उत्तर प्रदेशात एकही दंगा झाला नाही, हे भाजपच्या सरकारचे यश आहे.
कॉंग्रेसचे हेच लोक आज तुमच्या समोर मत मागायला येत आहेत, हिंदूंना अपमानित करण्यासाठी त्यांनी काय नाय केले आहे. देशात आतंकवाद, नक्षलवाद काँग्रेसने दिला असा आरोप योगी यांनी केला. आता काँग्रेस SC, ST, OBC च्या आरक्षणावर बोलत आहे. त्यांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा घाट त्यांनी घातला आहे. देशात जातीय जनगणना करुण हिंदूंना एकमेकात लढवणार, त्यानंतर आपले हक्क मुसलमानांना देण्याचे षडयंत्र सुरू केले आहे, आता आपण त्यांचे मनसुबे उधळून लावायाचे आहेत. मोदींनी देशाच्या विकासात दहा वर्ष काम केले, देशप्रेम हे त्यांच्यासाठी प्रथम आहे, काँग्रेस वाले मात्र देशाची फाळणीची भाषा करीत आहे, अशा काँग्रेस सोबत राहणार का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम सातपुते, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य , भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, देवेंद्र कोठे, ज्योती वाघमारे, मनीष काळजे, संतोष पवार, किसन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी आमदार राम सातपुते यांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा