गडहिंग्लज : ‘गोडसाखर’च्या 12 संचालकांचे सामूहिक राजीनामे | पुढारी

गडहिंग्लज : ‘गोडसाखर’च्या 12 संचालकांचे सामूहिक राजीनामे

गडहिंग्लज :  पुढारी वृत्तसेवा
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराला कंटाळून 12 संचालकांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. त्यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे आपले सामूहि राजीनामे सादर करून मंजूर करून घेतले. 12 संचालकांच्या या निर्णयामुळे कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोल्हापूर : प्रादेशिक सहसंचालकांकडे राजीनामे देताना संचालक .
कोल्हापूर : प्रादेशिक सहसंचालकांकडे राजीनामे देताना संचालक .

‘गोडसाखर’चे डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, दीपक जाधव, किरण पाटील, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, जयश्री पाटील, क्रांतिदेवी कुराडे या 18 पैकी 12 संचालकांनी राजीनामे देताना चेेअरमन शिंदेंच्या कारभारावर पत्रातून नाराजी व्यक्‍त केली. यावेळी संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये शिंदे यांनी कारखान्याची स्थिती न पाहता, त्याचे फायदे-तोटे न पाहता अविचारीपणे कारखाना सुरू केला असून, यामध्येही तालुक्यातील सभासदांचा ऊस न आणता कर्नाटकातून बिगर रिकव्हरीचा ऊस आणला आहे. शिंदे यांच्या मनमानी कारभारामुळे कारखाना तोट्यात गेला असून, आणखी तोट्यात जाणार आहे. यापूर्वीच्या झालेल्या 25 डिसेंबर 2020 व 13 जानेवारी 2022 च्या दोन्ही संचालक मंडळाच्या सभा कोरमअभावी तहकूब झाल्या असून, यादरम्यान काही बेकायदेशीर ठराव चेअरमन शिंदे यांनी केले असतील तर त्याला आम्हाला जबाबदार धरू नये, असेही स्पष्ट केले आहे.

गोडसाखर-आम्ही जबाबदार नाही…

यावेळी संचालकांनी चेअरमन अ‍ॅड. शिंदे यांनी आम्हाला विश्‍वासात न घेता सर्व निर्णय घेतले असून, 25 डिसेंबर 2020 नंतर कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ठराव केले असतील तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, असे स्पष्ट करतच राजीनामे दिले आहेत.

साखर विक्री थांबविण्याच्या सूचना…

दरम्यान, प्रादेशिक सहसंचालकांनी कारखाना प्रशासनाला तातडीचे पत्र दिले असून, यामध्ये 12 संचालकांनी ठपका ठेवत राजीनामा दिल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये तसेच साखर विक्री टेंडर व अन्य धोरणात्मक निर्णय संचालकांचा कोरम पूर्ण असलेल्या सभेतच घ्यावेत, असे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button