UP elections 2022 : …तर प्रशांत किशोर काँग्रेसवासी झाले असते : प्रियांका गांधींचा मोठा खुलासा | पुढारी

UP elections 2022 : ...तर प्रशांत किशोर काँग्रेसवासी झाले असते : प्रियांका गांधींचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ( UP elections 2022 ) प्रचाराला गती आली आहे. सत्ताधारी भाजपविरोधात समाजवादी पार्टीसह अन्‍य विरोधी पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनिमित्त ( UP elections 2022 ) वृतवाहिनी ‘एनडीटीव्‍ही’ ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्‍या राजकारणासह काँग्रेस पक्षाच्‍या भूमिकेबाबत आपली मते मांडली. तसेच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशार यांच्‍या काँग्रेस प्रवेशाबाबतही त्‍यांनी मोठा खुलासा केला.

यावेळी प्रियांका गांधी म्‍हणाल्‍या, निवडणूक रणनीतकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्‍ये प्रवेश करणार होते. मात्र काही कारणांमुळे हे शक्‍य झाले नाही. काही मुद्‍यांवर आमच्‍यामध्‍ये सहमती झाली नाही. त्‍यामुळे प्रशांत किशोर यांच्‍या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा पुढे गेलीच नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

गांधी कुटुंबीयांशी प्रशांत किशोर यांची झाली होती चर्चा

प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्‍ये प्रवेश करतील, अशी चर्चा मागील वर्षी राजकीय वर्तुळात रंगली होती. त्‍यांनी राहुल गांधी यांची भेटही घेतली हाेती. यानंतर ते काँग्रेसवासी होणारच, असे मानले जात होते. मात्र यानंतर ही चर्चा हवेत विरली. यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर जोरदार टीकाही केली होती. काँग्रेसमध्‍ये नेतृत्‍व करण्‍यासारखा नेताच नाही. हा पक्ष मागील दहा वर्षांमध्‍ये ९० टक्‍क्‍यांहून अधिक निवडणुकांमध्‍ये पराभूत झाला आहे. एक विरोधी पक्ष म्‍हणून काँग्रेसची भूमिका महत्‍वाची आहे. मात्र सध्‍या पक्षाकडे नेतृत्‍वच नसल्‍याने हे शक्‍य नसल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं होते.

२०१७ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी काम पाहिले होते. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी करण्‍यात त्‍यांचा मोठा वाटा होता. या आघाडीला मतदारांनी नाकारले. मात्र पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्‍यात प्रशांत किशोर यशस्‍वी ठरले होते.

UP elections 2022 : स्‍वबळावर निवडणूक लढवले होते महत्‍वाचे

मुलाखतीमध्‍ये प्रियांका गांधींचा उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्‍लाबोल केला. मागील पाच वर्ष उत्तर प्रदेशमध्‍ये भाजपचे सरकार सत्तेत होते. मात्र आता विधानसभा निवडणुका आल्‍यानंतर विकास कामांच्‍या केवळ घोषणा देण्‍याचे काम सुरु आहे. विमानतळ उद्‍घाटन आणि नवे उद्‍योग सुरु करण्‍याचे आश्‍वासन दिले जात आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारला यासाठी वेळच नव्‍हता का, असा सवालही त्‍यांनी केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्‍ही समविचार पक्षांशी चर्चा करण्‍यासाठी तयार होतो. आम्‍ही मागील काही वर्ष उत्तर प्रदेशमध्‍ये अनेक जागांवर निवडणूक लढवलीच नव्‍हती. ४०० पैकी केवळ १०० किंवा २०० मतदारसंघांमध्‍येच निवडणूक लढवली तर अन्‍य जागांवरही त्‍याचा परिणाम होत असतो. त्‍यामुळेच आम्‍ही स्‍वबळाचा नारा देत पक्षाला अधिक मजबूत करण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत, असेही प्रियांका गांधी यांनी स्‍पष्‍ट केले.

मायावतींवर असू शकतो केंद्र सरकारचा दबाव

आता विधानसभा निवडणूक जवळ आल्‍या आहेत तरीही बहुजन समाज पार्टीच्‍या प्रमुख मायावती या प्रचार सक्रीय झालेल्‍या नाहीत. मला असे वाटते की, त्‍यांच्‍यावर केंद्र सरकारचा दबाव असू शकतो, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी मुलाखतीवेळी केला.

हेही वाचलं का ?

 

Back to top button