सोनोग्राफी, गर्भपात केंद्रांची होणार गोपनीय तपासणी ; नाशिक महापालिका राबवणार धडक मोहीम | पुढारी

सोनोग्राफी, गर्भपात केंद्रांची होणार गोपनीय तपासणी ; नाशिक महापालिका राबवणार धडक मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील परळी आणि त्यानंतर अलिकडेच वर्धा येथील कदम नावाच्या रूग्णालयात घडलेल्या स्त्रीभ्रुण हत्येच्या घटनेनंतर राज्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, या विभागाने संबंधीत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना गोपनीयरित्या सोनोग्राफी सेंटर तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत अचानकपणे गोपनीय पध्दतीने शहरातील सर्वच सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्र तपासणीसाठी धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

मनपाचे वैद्यकीय अधिकार्‍यांची भरारी पथके स्थापन करून त्यांच्या मार्फत संबंधीत सेंटर तसेच केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे. सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची नोंदणी, मशिन खरेदी व नोंदणी तसेच इतरही सर्व रेकॉर्डची तपासणी होणार असून, याबाबतचा अहवाल तातडीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला सादर केला जाणार आहे.

नाशिक शहरात आजमितीस 324 सोनोग्राफी सेंटर आणि 148 इतके गर्भपात केंद्रांना मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने मान्यता दिलेली आहे. या सेंटरची तपासणी करण्याबरोबरच नोंदणीकृत नसलेले सेंटर किंवा मशिन आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

गर्भधारणापूर्व आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्याप्रमाणे गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी 50 हजार रूपये दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. काही दिवसांपूर्वीच वर्धा येथील कदम नावाच्या खासगी रूग्णालयाच्या आवारात नवजात बालकांच्या कवट्या आणि हाडे तसेच रक्ताने माखलेले कपडे आढळून आले होते. त्यावरून संबंधीत रूग्णालयात स्त्रीभ्रुण हत्या संदर्भात मोठे रॅकेटच कार्यरत असल्याची बाब निष्पन्न झाली असून, वर्धा येथील या घटनेमुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, वर्धा येथील घटनेने परळी (जि.बीड) येथील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.

आरोग्य संचालकांचे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार प्रत्येक सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची कसून तपासणी केली जाणार आहे. गैरप्रकार आढळून येणार्‍या केंद्रचालकांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शहरात स्त्रीभ्रुण हत्येसारखे प्रकार होत असल्यास नागरिकांनी वैद्यकीय विभागाला कळवावे. संबंधितांची नावे गोपनीय ठेवली जातील.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक- मनपा

हेही वाचा :

Back to top button