देवबाग किनारी देवमासा ची साडेदहा किलो ‘उलटी’! | पुढारी

देवबाग किनारी देवमासा ची साडेदहा किलो ‘उलटी’!

मालवण पुढारी वृत्तसेवा : देवबाग समुद्र किनार्‍यावर शुक्रवारी सकाळी स्थानिक मच्छीमार फ्रान्सिस फर्नांडिस आणि किस्तु लुद्रीक या मच्छीमारांना सुमारे साडेदहा किलो वजनाची ‘स्पर्म व्हेल’ देवमासा ची उलटी सापडली. या उलटीला ‘अंबरग्रीस’ म्हटले जाते. या बाबतची माहिती तत्काळ वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी देवबाग येथे जात ‘अंबरग्रीस’ ताब्यात घेतले.

हे ‘अंबरग्रीस’ पुढील तपासणीसाठी कोलकाता येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनपाल अमृत शिंदे यांनी दिली.

देवबाग-मधलीवाडी येथील स्थानिक मच्छीमार फ्रान्सिस फर्नांडिस आणि त्यांचे सहकारी किस्तु लुद्रीक हे शुक्रवारी सकाळी 6.30 वा.च्या दरम्यान समुद्रकिनारी गेले असता त्यांना ‘स्पर्म व्हेल’ची उलटी सापडली. त्यांनी तत्काळ याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांना दिली.

यावर खोबरेकर यांनी या उलटीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची फर्नांडिस यांना सूचना केली तसेच याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यानंतर कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे,वनपरिमंडळ अधिकारी श्रीकृष्ण परीट
घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून सुवासिक ‘अंबरग्रीस’ ताब्यात घेतले.

हे ‘अंबरग्रीस’ पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. वन अधिकार्‍यांनी मच्छीमारांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थांनी ‘अंबरग्रीस’ शासनाकडे सुपुर्द करणार्‍या मच्छीमारांना इनाम देण्याची मागणी केली.

यावेळी वनपाल श्री. शिंदे म्हणाले, ‘व्हेल’ माशाची ‘उलटी’ ही दुर्मीळ आहे. वन्यजीव कायदा 1972 नुसार त्याला संरक्षण देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही ‘व्हेल’ माशाला दुर्मीळ म्हणून संरक्षण दिले आहे. वन्यजीव कोणताही असेल तरी त्याचे अवयव आपल्याला विकता येत नाहीत.

‘व्हेल’ माशाच्या ‘उलटी’चा उच्चप्रतीच्या अत्तरासाठी वापर

‘व्हेल’ माशाच्या ‘उलटी’चा उच्चप्रतीच्या अत्तरासाठी वापर केला जातो हे आपण सर्वजण ऐकून आहोत. ‘व्हेल’ माशाची जी ‘उलटी’ स्थानिक मच्छीमारांना मिळाली त्याची माहिती देऊन वनविभागास सहकार्य केले आहे. त्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य खोबरेकर यांच्यासह स्थानिक मच्छीमारांचे कौतुक आहे.

सुमारे आठ ते दहा किलो वजनाची ‘उलटी’ असून ती पुढील तपासणीसाठी कोलकाता येथे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविली जाणार आहे. शासनाकडून या ‘उलटी’ची जेव्हा निश्‍चिती होईल त्यावेळी स्थानिक मच्छीमारांना शासनाकडून इनाम किंवा प्रोत्साहनपर मदत मिळवून देण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील,असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

कणखर सह्याद्रीत दरडी का कोसळत आहेत?

Back to top button