

चाकण ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सारख्या आवाजात बोलून व्यवहारातील पैश्यांची मागणी केल्याची घटना चाकण(ता.खेड जि.पुणे) मध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाकण मधील उद्योजक व पी.के. टेक्निकल महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रताप खांडेभराड यांच्या फिर्यादीवरुन चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धीरज धनाजी पठारे ( रा. यशवंत नगर, खराडी , पुणे ) व त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सारख्या आवाजात बोलून व्यवहारातील पैश्यांची मागणी केल्याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक कोटींहून अधिकची रक्कम प्रताप खांडेभराड यांना धीरज यांनी 2014 मध्ये दिली. त्यात व्याजासह पाच कोटींच्यावर रक्कम मागत होता. त्यापोटी त्यांनी तेरा एकर जमीनही घेतली. तरीही तो पैशाची मागणी करत राहिला.
दरम्यान त्याने ५ कोटींची रक्कम न दिल्यास प्रताप खांडेभराड व त्यांची पत्नी नंदा यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
मात्र खांडेभराड पैसे देत नसल्याने शेवटी पठारे याने शरद पवारांच्या आवाजाचा आधार घेतला. यासाठी सॉफ्टवेअरचा आधार घेत पवारांच्या मुंबई येथील लँडलाईन नंबरवरून कॉल केल्याचे दाखवले आणि अनोळखी इसमाच्या माध्यमातून शरद पवार यांचा आवाज काढून पैशांचीही मागणी केली. याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'हॅलो, मी शरद पवार बोलतोय' असा फोन एका मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला आला आणि तो अधिकारही हडबडला. हा शरद पवार यांचा आवाज हुबेहूब होता.
फोनवर चक्क शरद पवार बोलत होते आणि आवाजही हुबेहूब होता. शिवाय तो कॉल बदलीसाठी होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पडताळणी केली.
त्यानंतर हा फोन बनावट असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.