औरंगाबाद: रिक्षा पेट्रोलची, प्रमाणपत्र गॅसचे! शहरात रिक्षाचालकांची पिळवणूक | पुढारी

औरंगाबाद: रिक्षा पेट्रोलची, प्रमाणपत्र गॅसचे! शहरात रिक्षाचालकांची पिळवणूक

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : रिक्षाच्या मीटरची दरवाढ घोषित करताच आरटीओनी रिक्षाचालकांना नवीन दरानुसार मीटरची दुरूस्ती करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. मुदतीच्या आत मीटर दुरूस्ती करण्यासाठी तंत्रज्ञाकडे रिक्षाचालकांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत. अशात मात्र तंत्रज्ञ मनमानी पैसे उकळत पेट्रोलच्या रिक्षाला गॅसचे प्रमाणपत्र देऊन बोळवण करत आहेत. या बाबत आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ही चूक तंत्रज्ञाची आहे. त्यांनी दुरूस्त करावी जास्त पैसे मागत असेल तर त्याची तक्रार करावी असे सल्ला दिला.

रिक्षाचे मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी काही तासच शिल्लक असल्याने शहरातील तंत्रज्ञाकडे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यात चुकीच प्रमाणपत्र रिक्षाचालकांची डोकेदूखी बनली आहे. शहरातील एमएच-20 डीसी-0957 ही रिक्षा पेट्रोलवर चालणारी आहे. तशी नोंद या रिक्षाच्या आरसीबुकवरही आहे. असे असतांनाही या रिक्षाचालकाच्या कॅलिब्रेशन प्रमाणपत्रावर मात्र रिक्षा गॅसवर चालणारी असल्याचे नमूद केले आहे. हे प्रमाणपत्र चुकीचे असून यात दुरूस्ती करण्याची विनंती रिक्षाचालकांनी केली. परंतु त्याला पैसे भरून दुसरे प्रमाणपत्र काढावे लागेल असा सल्ला देण्यात येत आहे.

दरम्यान, ही चूक गंभीर नसून प्रमाणपत्राच्या चुकीची दुरूस्त करण्याचा आम्ही सल्ला देतो.रिक्षाचालकांच्या आरसी बूकवर वाहनांच्या प्रकाराची जी नोंद आहे तीच नोंद प्रमाणपत्रावर घेणे आवश्यक असून ही चूक संबंधित तंत्रज्ञाने सुूधारून देने त्याचे काम असल्याची माहिती सहायक परिवहन अधिकारी मेहरकर यांनी दिली.

सहा तंत्रज्ञ मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने शहरात सहा तंत्रज्ञाला परवानगी दिली आहे. शहरात रिक्षाची संख्या जास्त आणि तंत्रज्ञाची कमतरता असल्याने एकच गर्दी होत आहे. यामुळे रिक्षाचालकांवर जास्त पैसे देऊनही प्रमाणपत्र मिळवावे लागत आहे. तेही असे चुकीचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे पुन्हा प्रमाणपत्रासाठी पैसे मोजण्याची वेळ रिक्षाचालकांवर आल्याने रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा  

मुंबई : उपहारगृह पुढे चालू ठेवण्यासाठी २५ हजाराची लाच घेणा-या पीडब्लूडी अधिका-याला अटक

अग्निशमन जवानांचे शिडीवर चढण्याचे कष्ट कमी होणार!

बीड : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून ‘त्‍या’ शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश

Back to top button