बीड : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून ‘त्‍या’ शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश | पुढारी

बीड : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून 'त्‍या' शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश

केज(बीड), पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे विजेच्‍या धक्‍क्‍याने बैल दगावलाप्रकरणी तर दुसर्‍या एका प्रकरणात  सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

बैल दगावल्‍याप्रकरणी शेतकर्‍याला ५० हजार नुकसान भरपाई देण्‍याचे आदेश

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १० डिसेंबर २०१९ रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील बाळा रामभाऊ निकम यांच्या शेतातून गेलेल्या वीजेची तार तुटली. ती अंगावर पडल्‍याने बैल दगावला होता. या प्रकरणी त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे नुकसान भरपाईसाठी दाद मागितली होती. उपलब्ध कागदपत्रे व पुराव्या आधारे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने शेतकऱ्यास ५० हजार नुकसान भरपाई आणि आर्थिक व मानसिक त्रासापोटी ३ हजार व दाव्याच्या खर्चापोटी २ हजार असा ५५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. असा आदेश दिले आहेत. तसेच निकाल लागल्यापासून नुकसान भरपाईची रकमेवर ८ टक्के दराने व्याज देण्याचे आदेशही दिले आहेत.

बियाणे न उगवल्याप्रकरणी  पाच लाखांची नुकसान भरपाई देण्‍याचे आदेश

दुसऱ्या प्रकरणात युसुफवडगाव येथील सन २०२० च्या खरीप हंगामासाठी किरण आत्माराम जावळे आणि आशिष आत्माराम जावळे या दोन भावांनी केज येथील संतोष कृषी सेवा केंद्रातून ग्रीन सिड्स कंपनीचे ३३४४ वाणाचे १३ बॅग सोयाबीन ज्याची किंमत ३२ हजार ८२ रु. चे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यांनी पूर्व मशागत करून पेरणी केली. परंतु ते बियाणे व्यवस्थित उगवले नाही. म्हणून त्यांचे आर्थिक नुकसान झाले.त्याबाबत त्यांनी ग्रीन सिड्स बियाणे कंपनी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि सदर बियाणे खरेदी केलेल्या कृषी सेवा केंद्राला कळविले. या बाबत त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षांनी , सदर ग्रीन सिड्स कंपनीने तक्रारदाराला ५ लाख ३४ हजार ८२५ नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले. तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार आणि दाव्याच्या खर्चापोटी १ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. निकाल लागल्यापासून नुकसान भरपाईची रकमेवर ८ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.या दोन्ही निकालामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून बियाणे उत्पादक कंपनी व वीज वितरण कंपनीला चपराक बसली आहे.

हेही वाचा  : 

Back to top button