अग्निशमन जवानांचे शिडीवर चढण्याचे कष्ट कमी होणार! | पुढारी

अग्निशमन जवानांचे शिडीवर चढण्याचे कष्ट कमी होणार!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई अग्निशमन दलामध्ये जर्मन बनावटीचे 64 मीटर उंच 2 टर्नटेबल लॅडर दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे या टर्नटेबल लॅडरला लिफ्टची सुविधा असल्याने इमारती आग लागल्यास रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी टर्नटेबल लॅडरच्या शिडीवर चढताना होणारे कष्ट कमी होणार आहेत.

देशातील अन्य महानगरपालिकेपेक्षा मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल अत्याधुनिक साधनसामुग्रीने सज्ज आहे. अग्निशमन दलात डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली आग विझवण्यासाठी रोबो, त्याशिवाय 90 मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर म्हणजेच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, आरटीक्युलेतेड वॉटर टॉवर हॅजमेट, रेस्कू, क्विक रिस्पॉन्स वाहने आणि ब्रीदिंग अपरेटससह जलद आग विझविण्याची प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक ऑटोमेटेड लॅडर वाहने आहेत. त्याच सोबत आता 64 मीटरच्या 2 टर्नटेबल लॅडर दाखल होणार असल्याने अत्याधुनिक वाहनांची संख्या वाढणार आहे. या वाहनांच्या पाहणीसाठी अग्निशमन विभागाची एक टीम जर्मनीला गेली होती.

सध्या अग्निशमन दलात असलेले सुमारे 200 किलोचे लॅडर उचलण्यासाठी चार जवानांची आवश्यकता भासते. त्यामुळे दर वेळी लॅडर म्हणजेच शिडीची हलवाहलव करणे अवघड जाते. मात्र आता नव्याने येणाऱ्या टर्नटेबल लॅडर वाहनामध्ये फायर फायटिंग कम रेस्कू या दोन्ही सुविधा त्या देखील जलद पद्धतीने देण्यासाठीची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तसेच या लॅडरला बसविणे सोपे असून याला असलेल्या लिफ्टच्या सुविधेमुळे घटनास्थळी अडचणीत अडकलेल्या नागरिकांना रेस्कू करणे सोपे होणार असल्याचे उप प्रमुख अग्निशमन अधिकारी ए. व्ही. परब यांनी सांगितले.

3 नागरिकांना एकावेळी रेस्क्यू करण्याची सुविधा

नव्याने खरेदी करण्यात येणारे टर्नटेबल लॅडर 64 मीटर म्हणजेच 21 मजल्यापर्यंत लिफ्टच्या सहाय्याने पोहचणे शक्य आहे. या लॅडरद्वारे एकावेळी तीन नागरिकांना रेस्कू करता येणार आहेत. पूर्वीच्या मॅन्युअल शिड्यांपेक्षा नवीन शिडी फिक्स करण्यातील वेळ 5 ते 7 मिनिटांनी कमी होणार आहे. हे दोन टर्नटेबल लॅडर 20 कोटी 74 लाख 29 हजार रुपयाला खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने जानेवारी 2023 मध्ये अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होतील अशी माहिती उप प्रमुख अग्निशमन अधिकारी परब यांनी सांगितले.

.हेही वाचा 

मोठी बातमी – एअर इंडिया आणि विस्ताराचे लवकरच विलीनीकरण | Merger of Air India and Vistara

सीमेपलीकडील इसिस प्रेरित दहशतवादाचा मानवतेला धोका : अजित डोभाल

नगर: महापालिकेत सत्ताधाऱ्यांना घराचा आहेर, सावेडी स्मशानभूमी भूसंपादनाला राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांचा विरोध

Back to top button